|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगली, मिरजेत दमदार मान्सूनपूर्व

सांगली, मिरजेत दमदार मान्सूनपूर्व 

प्रतिनिधी /सांगली :

गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने सांगलीत गुरूवारी जोरदार आगमन केले आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच जिल्हय़ात पावसाचे वातावरण झाले होते. कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागात पावसाचे दमदार आगमन झाल्यानंतर सायंकाळी साडेसात नंतर सांगली शहरात पावसाच्या सरी सुरू झाल्या. अचानक आलेल्या या पावसाने बाजारपेठेत चांगलीच धावपळ सुरू झाली. शिवाजी मंडई, गणपती पेठ, मारूती रोड याठिकाणी व्यापाऱयांची आणि हातगाडी विपेत्यांची  या पावसामुळे चांगलीच दमछाक झाली. मान्सूनपूर्व पावसामुळे शहरातील वातावरण चांगलेच थंड झाले होते. यापावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

आठवडय़ापूर्वी शहरात गारांचा पाऊस झाला होता. त्यानंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला होता. पण, दमदार पावसाचे आगमन झाले नव्हते. गुरूवारी सांयकाळपासून वातावरणात मोठय़ाप्रमाणात बदल झाला होता. पावसाची चाहूल लागली होती. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन होणार याची खात्री झाली होती. जिल्हय़ात शेतकऱयांकडून खरीप पेरणीच्या तयारीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाची आवश्यकता होती. गुरूवारी मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे बळीराजा खुश झाला आहे. केरळमध्ये दोन दिवसापूर्वीच पावसाचे आगमन झाले आहे. वेळेत मान्सून येणार असल्याने बळीराजा खुशीत होता. त्याबरोबरच आता मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने त्याचा आनंद व्दिगुणीत झाला आहे.

शहरात मात्र चांगलीच धावपळ

शहरात मान्सूनपूर्व पाऊस आल्यानंतर मात्र जोरदार धावपळ झाली बाजारपेठेत सायंकाळी चांगलीच गर्दी होती. हा पाऊस एकदम आल्यानंतर ग्राहक आणि विक्रेत्याची एकच पळापळ सुरू झाली. अनेक विक्रेत्यांनी आपला दुकानाबाहेर ठेवलेला माल आत घेण्यासाठी तर ग्राहकांची पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून दुकानात गर्दी केली होती. एकदम आलेल्या पावसाने मात्र सांगलीतील पावसाचे पाणी साच्ले होते. तसेच अनेक ठिकाणी  गटारीचे पाणी वर आले होते. त्यामुळे या साचलेल्या आणि गटारीतील पावसाच्या पाण्यातूनच वाट काढत सांगलीकरांना जावे लागत होत. यामध्ये शिवाजी मंडई, स्टेशन रोड, झुलेलाल चौक, मथुबाई गरवारे महाविद्यालयसमोर, राममंदिर कॉर्नर तसेच सिव्हील हॉस्पिटल चौक आणि सिव्हिल हॉस्पिटल रोडवर पाणी साचले होते.