|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » भिवंडीत कवडीमोल दरात कामगारांकडून नालेसफाई

भिवंडीत कवडीमोल दरात कामगारांकडून नालेसफाई 

ऑनलाईन टीम / ठाणे :

महापालिकेचे पैसै वाचवण्यासाठी कामगारांकडून कवडीमोल रोजंदारीत नालेसफाई करून घेतल्याचा प्रकार भिवंडी महापालिकेत समोर आला आहे. कामगारांना किमान वेतनाप्रमाणे दररोज 606 रूपये दिले पाहिजे, अशी नोंद आहे. पण भिवंडी महापालिकेत यापेक्षा कमी पैसे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भिवंडीकरांना पावसाळा नीट जावा यासाठी दररोज नाल्यांमध्ये जीवाची पर्वा न करता, कुठल्याही प्रकारचे रोगप्रतिबंधक साहित्य नसताना, कमरेपर्यंत उतरून त्यातला हजारो मेट्रिक टन गाळ कामगार हातांनी उपसतात. कामगारांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष तर होत आहे, मात्र त्यांनी केलेल्या कष्टाच्या कमाईतूनही महापालिका बचत करत आहे. महापालिका आयुक्त मनोहर हिरे आणि अतिरिक्त आयुक्तांचा पारदर्शकतेचा दावाच फेल ठरल्याचे दिसून येत आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे यावषी फार कमी रकमेमध्ये उत्कृष्ट नालेसफाई करणार असल्याचे सांगितले. वस्तूस्थिती पहिली असता महापालिकेने पत्रकारांना सोबत घेऊन केलेल्या दौऱयामध्ये मनपाच्या रेकॉर्डवर किमान वेतनप्रमाणे 606 रूपये दररोज दिले जातात. मात्र महिला कामगारांना 350 रूपये, तर पुरूष कामगारांना 400 ते 450 रूपये देऊन कामगारांची लूट केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शहरात जवळपास 42 हजार मीटर लांबीचे छोटेमोठे नाले आहेत. यावषी नालेसफाईमध्ये ठेकेदारांनी निविदा न भरल्यामुळे महापालिका स्वतः रोजंदारी कामगार लावून नालेसफाईचे काम करत आहे. भिवंडी महापालिकेचे पाच प्रभाग समिती मिळून एकूण 87 नाले आहेत. त्यापैकी 59 नाल्यांचे काम पूर्ण झाल्याचा आयुक्तांचा दावा आहे. दरवषी ठेकेदार मनपाची नालेसफाई न करता मनपाची आर्थिक तिजोरी साफ करत असल्याची नेहमीच ओरड होत होती. त्यामुळे ठेकेदारांनी यावषी निविदांकडे पाठ फिरवली. असे असतांना आर्थिक बचत करण्याच्या नावाखाली स्वतःची पाठ थोपटून घेणाऱया मनपाने मात्र सफाई कामगारांकडून अत्यंत कमी दरात काम करून घेतले.

Related posts: