|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘लाचलुचपत’च्या कामाचा टक्का घसरतोय!

‘लाचलुचपत’च्या कामाचा टक्का घसरतोय! 

संजय पवार/ सांगली

अधिकारी आणि अस्थापनातील रिक्त असलेल्या पदामुळे सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कारभार ढेपाळला आहे. दोन वर्षापूर्वी लाच स्वीकारणाऱया ‘सरकारी बाबूं’ना बेडय़ा ठोकण्यात पश्चिम महाराष्ट्रात अव्वलस्थानावर असलेला जिल्हा सद्य स्थितीला शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. तर सोलापूर जिल्हय़ाने अव्वलस्थान पटकाविले आहे. त्यामुळे सांगलीच्या ‘लाचलुचपत’च्या कामाचा टक्का घसरत चालला असल्याचे चित्र आहे.

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातून सर्वसामान्यांच्याकडून कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करणाऱया सरकारी बाबूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशा स्वरूपात शासकीय कार्यालयातून होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. सांगलीतही हा विभाग कार्यरत आहे. पण, या विभागाकडील कार्यालयीन प्रमुख पोलीस उपाधिक्षकासह दोन पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱयांची पदे गेल्या सहा महिन्यापासून रिक्त होती. पण,  कार्यालयीन प्रमुख म्हणून पोलीस उपाधीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. पण, इतर पदे अद्यापही रिक्तच आहेत.

सन 2017 मध्ये या विभागाकडे सुमारे 50 हून अधिक तक्रारी आल्या. यापैकी 19 सापळे यशस्वी झाले. यामध्ये पोलीस आणि महसूल विभागातील प्रत्येकी सात, दुय्यम निबंधक, पाटबंधारे, मोजणी कार्यालयातील प्रत्येक एक आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयाकडील तीन सरकारी बाबूंचा समावेश आहे. तर सन 2018 मध्ये गेल्या पाच महिन्यात एकूण केवळ आठ सापळे यशस्वी झाले असून यामध्ये वीज वितरण, महिला बालकल्याण, जिल्हा परिषद, आणि पोलीस विभागातील प्रत्येकी एक तर महसूल आणि वीज वितरण विभागातील प्रत्येकी दोन सरकारी बाबूंचा समावेश आहे.

गेली पाच महिने या विभागाचे कार्यालयीन प्रमुख असलेले पोलीस उपाधिक्षक हे पदच रिक्त होते. त्यामुळे सातारा जिल्हय़ाच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपाधीक्षकांच्याकडे गेली पाच महिने अतिरिक्त कारभार होता. गेल्या पाच महिन्यात या विभागाकडे सुमारे 40 हून अधिक तक्रारदार आले. पण, यापैकी केवळ आठच सापळे यशस्वी झाले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱयांच्या विरूध्द तक्रारी येऊनही ते या विभागाच्या सापळय़ातून सहीसलामत बाहेर पडत आहेत. 40 हून अधिक तक्रारी येऊनही केवळ आठच सापळे यशस्वी झाले आहेत. अधिकारी आणि अस्थापनातील असलेल्या रिक्तपदामुळे तक्रारी येऊनही सापळे यशस्वी करून सरकारी भ्रष्टाचारी बाबूंना बेडय़ा ठोकण्यात या विभागाला तारेवरची कसरत करावी लागत असून या विभागाचा कारभरच ढेपाळला आहे.

लाचलुचपतच्या पुणे युनिटमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्हय़ांचा समावेश आहे. सन 2015 मध्ये पुणे युनिटमध्ये सांगली जिल्हा अव्वलस्थानी होता. पण, सद्यस्थितीला शेवटच्यास्थानी पोहोचला असून सोलापूर जिल्हा अव्वलस्थानी पोहोचला आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत सोलापूर लाचलुचपत विभागाने तब्बल 19 सरकारी बाबूंना बेडय़ा ठोकल्या असून यामध्ये क्लासवन पदाच्या सात अधिकाऱयांचा समावेश आहे. सांगलीच्या लाचलुचपत विभागाचा गेली पाच महिने कारभार रामभरोसे ठरल्याने अव्वलस्थानावरून शेवटच्या स्थानावर पोहचला आहे.

राज्य पोलीस विभागातीलच अधिकाऱयांना एकपद जादा देऊन या विभागाकडे पाठविले जाते. या विभागाकडे काम करण्यास पोलीस अधिकारी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे सांगलीतील महत्वाची सर्वच पदे गेल्या काही महिन्यापासून रिक्त राहीली आहेत. जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनीही याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

Related posts: