|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अंबेनळी घाटातील महाकाय दगड हटविला

अंबेनळी घाटातील महाकाय दगड हटविला 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

अपघाताला निमंत्रण देणारा व गेली दहा महीने ठाण मांडुन बसलेला मेटतळे गावा जवळील अंबेनळी घाटातील महाकाय दगड सार्वजनिक बांधकाम खात्याने स्फोटाच्या सहायाने हटविला आहे. मागील महीन्यात या संदर्भाचे वृत्त ‘तरूण भारत’ने प्रसिध्द करुन सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेवून पावसाळया पुर्वी हा दगड हटविल्याने या परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

  गेल्या वर्षी ऑगस्ट महीन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मेटतळे गावाच्या खालील बाजुस अंबेनळी घाटात दरड कोसळली होती. यावेळी डोंगराचा मोठा उभा भाग डोंगरापासून अलग होवून रस्त्याच्या कडेला उभा राहीला होता. त्यामुळे या रस्त्याचे मोठे नुकसान झाले होते. तसेच भागातून एकेरी वाहतूक सुरू होती. अशा प्रकारे घाटात आलेले दगड असो अथवा दरडी काही दिवसातच सार्वजनिक बांधकाम खात्यांकडून हटविण्याचे काम होत होते. परंतु यावेळी हा दगड गेली दहा महीने घाटात ठाण मांडून बसला होता. या संदर्भात माहीती घेतली असता निधी अभावी हा दगड हटविण्याचे काम करता आले नाही हा दगड हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने साधारण 14 लाख रूपयांचे अंदाजपत्रक वरीष्ठ कार्यालयाकडे पाठविले होते. परंतु गेली दहा महीने या संदर्भात काहीच हालचाली न झाल्याने हा महाकाय दगड घाटात तसाच उभा होता पावसाळा तोंडावर आला असतानाही हा दगड काढण्या बाबत प्रशासन उदासिन दिसल्याने या संदर्भात ‘तरूण भारत’ ने सविस्तर वृत्त दिले होते पावसाळया पुर्वी जर हा दगड काढला नाही तर पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांच्यातील महाबळेश्वर मार्गे होणार संपर्क तुटण्याची भिती व्यक्त केली होती. तसेच तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांचाही महाबळेश्वरशी संपर्क तुटला असता परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने हे वृत्त प्रसिध्द होताच वेगवान हालीचाली केल्या.  

    सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी या भागातील वाहतूक काही काळ बंद करुन महाकाय दगडाला स्फोटाच्या मदतीने उडवून देण्यात आले. हे अवघड काम सार्वजनिक बांधकाम खात्याने काही तासातच पूर्ण केल्याने महाबळेश्वर तालुक्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच या संदर्भाचे वृत्त प्रसिध्द करुन त्याचा पाठपुरावा केल्याबद्दल ‘तरूण भारत’चे देखील अभिनंदन होत आहे.