|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बीएसएनएलच्या क्रॉस कनेक्शनने ग्राहक त्रस्त

बीएसएनएलच्या क्रॉस कनेक्शनने ग्राहक त्रस्त 

प्रतिनिधी / कणकवली:

बीएसएनएल मोबाईलची रेंज गायब होण्याचा प्रकार नित्याचा झालेला असतानाच आता रेंज असताना ‘क्रॉस कनेक्शन’ लागण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. चार-चारवेळा फोन केल्यावरही क्रॉस कनेक्शन लागणे, रिंग न होताच कॉलिंगचे सेकंद पडून पैसे कट होणे, असे प्रकार घडत असल्याने ग्राहक पुरते वैतागले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलच्या रेंज गायब होण्याच्या समस्येने ग्राहकवर्ग पुरता वैतागलेला आहे. बीएसएनएलचे इंटरनेट तर अनेकदा नसतेच. तरीही कंपनीकडून महिन्याचे शुल्क घेतले जातेच. आता गेल्या दोन दिवसांपासून बीएसएनएलवरून फोन केल्यानंतर क्रॉस कनेक्शन लागण्याचे प्रकार वाढले आहेत. फोन केल्यानंतर रिंग न होताच कॉलिंगचे सेकंद पडतात. पलिकडून तिसऱया व्यक्तीचा चौथ्या व्यक्तीसोबत बोलत असल्याचा आवाज येतो. काही वेळानंतर कॉल कट होतो. यात आपण न बोललेल्या कॉलचे पैसे कट होतात, असे प्रकार घडत आहेत. सोमवारी तर या समस्येत वाढ झालेली होती. त्यामुळे ग्राहकवर्ग पुरता वैतागून गेला आहे.