|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » आरबीआयकडून रेपोदर वाढीच्या शक्यतेने विक्री

आरबीआयकडून रेपोदर वाढीच्या शक्यतेने विक्री 

बीएसईचा सेन्सेक्स 215, एनएसईचा निफ्टी 67 अंकाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला प्रारंभ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये दडपण दिसून आले. यावेळी बैठकीत रेपोदरात वाढ होणार असल्याचे अनेकांचे मत असल्याने बाजारात विक्री आली. बीएसईच्या रिअल्टी निर्देशांकामध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. याव्यतिरिक्त बँकिंग, अर्थसेवा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तू निर्देशांकही कोसळले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरून मजबूत संकेत मिळाल्याने बीएसईचा सेन्सेक्स 35,555 पर्यंत वधारला होता. मात्र दिग्गज कंपन्यांच्या समभागात विक्रीला प्रारंभ सुरू झाल्याने तो 215 अंकाने घसरत 35,011 वर स्थिरावला. एनएसईचा निफ्टी 67 अंकाच्या कमजोरीने 10,628 वर बंद झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातून चांगले संकेत मिळूनही आरबीआयकडून रेपोदरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे परिणाम बाजारात दिसून आले. याचप्रमाणे सर्व कंपन्यांकडून मार्च तिमाहीचे निकाल जारी करण्यात आल्याने गुंतवणूकदारांची नजर आता कच्चे तेल आणि रुपयाच्या मूल्यावर आहे. मात्र यंदा समाधानकारक मान्सून आणि मार्च तिमाहीत विकास दर उंचावल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेत तेजी येण्याची शक्यता आहे, असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

सेन्सेक्सच्या दिग्गज समभागात एचडीएफसी बँक 2.99 टक्के आणि अदानी पोर्ट्स 2.87 टक्क्यांनी घसरले. भारती एअरटेल, पॉवरग्रिड, हिंदुस्थान युनि, ओएनजीसी, एनटीपीसी, एसबीआय, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय बँक 2.77-1.14 टक्क्यांनी कमजोर झाले. डॉ. रेड्डीज लॅब 2.86 टक्क्यांसह इन्फोसिस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टाटा स्टील, रिलायन्स इन्डस्ट्रीज, येस बँक वधारले.

बीएसईची क्षेत्रीय कामगिरी पाहता रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक 3.25 टक्के, ऊर्जा निर्देशांक 2.32 टक्के, दूरसंचार 1.95 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू 1.83 टक्क्यांनी कमजोर झाले. आयटी, टेक, धातू निर्देशांकांत 0.42 टक्क्यांपर्यंत तेजी आली.

बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 2.09 टक्के, मिडकॅप निर्देशांक 0.82 टक्क्यांनी कमजोर झाला.