|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टा अतिरिक्त तहसीलला पदसंख्येसह मंजुरी

आष्टा अतिरिक्त तहसीलला पदसंख्येसह मंजुरी 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

महाराष्ट्र शासनाच्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत आष्टा येथील अतिरिक्त तहसील कार्यालयास मंजुरी दिली आहे. पदसंख्येसह ही मंजुरी देण्यात आली असून जागा निश्चित करुन लवकरच अतिरिक्त तहसीलचे कामकाज सुरु होईल, अशी माहिती सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील व सरचिटणीस वैभव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 29 मे 2017 रोजी भोसले-पाटील व शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव शिंदे यांनी अन्य काही मागण्या बरोबरच आष्टा तालुका निर्मितीची मागणी केली होती. ही मागणी अनेक वर्षाची होती. येथील यल्लामा चौकात झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करुन आष्टय़ाला अतिरिक्त तहसीलचा दर्जा देवू, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आष्टेकरांना उत्सुकता होती.

    भोसले-पाटील व शिंदे म्हणाले, आष्टा तालुक्याची निर्मिती करावी, ही जुनी मागणी होती. माजी आ. विलासराव शिंदे यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे भाजपात प्रवेश करताना मुख्यमंत्री फडणवीस व अन्य नेत्यांशी चर्चा करताना ही मागणी आग्रही होती. प्रवेश सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतंत्र तालुका निर्मितीला वेळ लागला तरी आष्टय़ाला तात्काळ अतिरिक्त तहसीलचा दर्जा देवू, अशी ग्वाही दिली होती. त्याबाबत पाठपुरावा सातत्याने सुरु होता. उच्चस्तरीय बैठकीत पदसंख्येसह अतिरिक्त तहसील मंजूर करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासनाची पूर्ती केली आहे. हा पाठपुरावा करताना मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या अतिरिक्त तहसीलमुळे लोकांचा वेळ व पैसा वाचणार असून अनेक महसूल कामांची तात्काळ निर्गती करणे सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.