|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » आरबीआयच्या पतधोरणापूर्वी घसरण कायम

आरबीआयच्या पतधोरणापूर्वी घसरण कायम 

बीएसईचा सेन्सेक्स, निफ्टी घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीच्या पत्रकार परिषदेपूर्वी गुंतवणूकदारांकडून विक्री करण्यात आल्याने बाजार सलग तिसऱया सत्रात घसरला. सेवा क्षेत्राचा पीएमआय उतरल्याने त्याचे बाजारात परिणाम दिसून आले.

आरबीआयकडून व्याजदर वाढीची शक्यता असल्याने रिअल्टी, बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग घसरले. आरबीआयची चालू आर्थिक वर्षातील दुसरे पतधोरण आज जाहीर होणार आहे.

बीएसईचा सेन्सेक्स 108 अंकाने घसरत 34,903 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 35 अंकाच्या कमजोरीने 10,593 वर स्थिरावला. सत्रातील जास्तवेळ बाजारात नकारात्मकता दिसून आली, तर 34,784 हा नीचांक बाजाराने गाठला होता. गेल्या तीन सत्रात बाजार 419 अंकाने कमजोर झाला.

रुपया कमजोर आणि आरबीआयच्या पतधोरणापूर्वी गुंतवणूकदारांमध्ये दबाव दिसून आला. आरबीआयने व्याजदर कायम ठेवावेत असे गुंतवणूकदारांची इच्छा आहे, मात्र बुधवारी आरबीआयकडून कोणता निर्णय घेण्यात येतो हे पाहणे आवश्यक आहे. तेलाच्या वाढत्या किमतीने आरबीआयला कठोर निर्णय घेणे भाग पडेल असे गिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख संशोधक विनोद नायर यांनी सांगितले.

सेन्सेक्समध्ये कोल इंडिया 2.36 टक्के आणि भारती एअरटेल 2.16 टक्क्यांनी सर्वाधिक घसरले. याव्यतिरिक्त एल ऍण्ड टी, डॉ. रेड्डीज लॅब, येस बँक, पॉवरग्रिड, इन्फोसिस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टीसीएस, ऍक्सिस बँक 1.93-1.30 टक्क्यांनी घसरले. रिलायन्स इन्डस्ट्रीज सर्वाधिक उसळला. टाटा स्टील, एचडीएफसी, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, हीरो मोटो, इन्डसइंड बँक यांचे समभाग वधारले.

क्षेत्रीय कामगिरी पाहता, दूरसंचार निर्देशांक 3.08 टक्के, भांडवली वस्तू 1.96 टक्के, इन्फ्रास्ट्रक्चर 1.72 टक्के, टेक 1.58 टक्के, आयटी 1.52 टक्क्यांनी कमजोर झाले. तेल आणि वायू निर्देशांक 0.10 टक्क्यांनी वधारले.

स्मॉलकॅप निर्देशांक 2.43 टक्के आणि मिडकॅप निर्देशांक 1.20 टक्क्यांनी घसरले. साखर कारखान्यांना निधी देण्याच्या अपेक्षेने साखर कंपन्यांचे समभाग वधारले.