|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोरगावातील ‘धिरयो’त लाखोंची उलाढाल

कोरगावातील ‘धिरयो’त लाखोंची उलाढाल 

प्रतिनिधी/ पणजी, पेडणे

कोरगाव-पेठेचावाडा येथे मंगळवारी पहाटे झालेल्या धिरयोत मडगाव येथील शार्प शुटरने डोंबिवली-मुंबई येथील किंग संग्रामचा पराभव करून लाखो रुपयांपेक्षा जास्त रक्कम मालकाला मिळवून दिली. यावेळी गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र अशा राज्यातून सुमारे आठ ते दहा हजाराहून अधिक लोकांची उपस्थित होती. तसेच वाहनांची संख्याही एक हजाराहून अधिक होती. या धिरयो राजकारणी तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एकंदरीत या प्रकारातून आता देवाण-घेवाणवरून मोठा तंटा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

डोंबिवली-मुंबई येथून खास किंग संग्राम या बैलाचे आठवडय़ापूर्वीच कोरगाव येथे आगमन झाले होते. या धिरयो 3 व 4 जून रोजी आयोजित केल्या होत्या. परंतु सकाळीच पेडणे पोलीस धिरयोस्थळी पोहचल्याने तो होऊ शकला नाही. नंतर पोलिसांशी हातमिळवणी करून आयोजकांनी परत मंगळवारी 5 रोजी पहाटे धिरयोचे आयोजन केले. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक येथील लोकांचे तांडेच्या तांडे कोरगावच्या दिशेने सरकताना दिसत होते. या धिरयोचा थरारक अनुभव धिरयोप्रेमींना घेतला. काल झालेल्या या धिरयोत गोव्याच्या शार्पशुटरने डोंबिवली-मुंबई येथील किंग संग्रामचा पराभव केला.

धिरयोमुळे वाहतुकीची कोंडी

कोरगावात धिरयोचे आयोजन केल्याची माहिती मिळाल्याने हजारो लोकांची गर्दी उसळली होती. 15 ते 20 मिनिटे चाललेल्या धिरयोनंतर आपापली वाहने घेऊन माघारी फिरणाऱया या लोकांमुळे कोरगाव परिसरातील रस्त्यांवर सुमारे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे शाळा, कॉलेज तसेच कामावर जाणाऱया लोकांना त्याचा बराच त्रास झाला.

बंदी असतानाही धिरयोंचे आयोजन कसे?

धिरयोवर कायदेशीर बंदी असतानाही पेडणे तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने वरच्यावर धिरयोचे आयोजन केले जाते. या विषयी कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी नसताना गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातून धिरयोप्रेमी या ठिकाणी कसे पोचतात तसेच दक्षिण गोव्यातील हे धिरायोचे आयोजक पेडणे तालुक्याचाच आश्रय का घेतात हा कोरगावकरांना पडलेला प्रश्न आहे. सध्या नमन तुका गोंयकारा करून लोकांच्या समस्यांवर आवाज उठवणारे काँग्रेसवाले या धिरयोवर आवाज उठवतील का असा प्रश्न प्राणीप्रेमी उपस्थित करीत आहेत.

धिरयोवर कोटय़वधीची उलाढाल

या धिरयोत प्रत्येकाच्या बाजूने 25 लाख रकमेची बोली लागली होती. या शिवाय धिरयोसाठी आलेल्या लोकांमध्येही आपापसात लाखो रुपयांच्या पैजा लागल्या होत्या. या रकमेचे मोजमाप केल्यास ही रक्कम कोटीच्या घरात निश्चितच पोचली असेल, असे एका धिरयोप्रेमीने आपल्या आवेशात सांगितले.

अन् अनेकजण गहिवरले…

या धिरयोत गोव्याच्या शार्प शुटरची टोकदार शिंगे लागल्याने डोंबिवली-मुंबई येथील किंग संग्राम बराच रक्तबंबाळ झाला होता. यात त्याचा पराभवही झाला. परंतु धिरयोनंतर रक्तबंबाळ झालेल्या किंग संग्रामच्या मानेभोवती मालकाने कपडा बांधल्याचे पाहून अनेकांना गहिवरून आल्याचे धिरयोप्रेमींनी सांगितले.

धिरयोसाठी पोलिसांकडे सेटींग

या धिरयोच्या आयोजनासाठी पेडणे पोलिसांना मोठय़ा प्रमाणात हप्ता दिल्याची चर्चा होत आहे. मंगळवारी झालेल्या धिरयो कुठल्याही अडथळय़ाविना पार पडल्या. त्यामुळे धिरयो आयोजक व पोलिसांत सेटींग झाल्याचीही चर्चा होत आहे.

धिरयो कायदेशीर कराव्यात : जितेंद्र देशप्रभू

 देशात घोडय़ांच्या शर्यती लावल्या जातात त्यातून सरकारला कर मिळतो. तसेच गोव्यात कॅसिनोत चालणाऱया जुगारातून कोटय़वधीचा महसूल सरकारच्या तिजोरीत पडतो. धिरयोतून सरकारच्या तिजोरीत महसूल पडत असेल तर धिरयोंना मुळीच विरोध नाही. परंतु परस्पर हप्ते घेणाऱयांवर आपला विरोध आहे. त्यामुळे पोलिसांनी आपली कारवाई करावी. धिरयो हा खेळाचा प्रकार असून तो कायदेशीर करावा, अशी मागणी माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी केली आहे.

Related posts: