|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ करणार : राहुल

10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ करणार : राहुल 

मध्यप्रदेशच्या मंदसौर येथे सभा : मोदींना केले लक्ष्य, सत्ता सोपविण्याचे जनतेला आवाहन

वृत्तसंस्था/ मंदसौर

मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये शेतकऱयांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला एक वर्ष झाल्यानिमित्त आयोजित सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आक्रमक भूमिका दिसून आली. मंदसौर येथील शेतकऱयांच्या सभेला संबोधित करताना राहुल यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास 10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा राहुल यांनी यावेळी केली.

सभेपूर्वी राहुल यांनी पोलिसांच्या गोळीबारात मागील वर्षी मारल्या गेलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास गोळीबारात मारल्या गेलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना 10 दिवसांत न्याय मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भाजप सरकार मोठय़ा उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, परंतु शेतकऱयांचा एक रुपया देखील माफ केला जात नसल्याचा आरोप राहुल यांनी केला.

प्रत्येक जिल्हय़ात प्रक्रिया उद्योग

शिवराज सिंग चौहान सरकारच्या काळात शेतकऱयाला बाजारात धनादेश मिळतो, बँकेत गेल्यास लाच स्वीकारली जाते. परंतु काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱयांना बाजारातच पैसे दिले जातील. प्रत्येक जिल्हय़ात खाद्य प्रक्रिया उद्योग सुरू करणे आणि त्यात स्थानिकांना रोजगार देण्यात येईल, याच्या माध्यमातून चीनशी स्पर्धा केली जाणार असल्याचे राहुल म्हणाले.

मोदींकडून आश्वासनांची पूर्तता नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पिकाचा पूर्ण भाव मिळेल असे आश्वासन लोकांना दिले होते, परंतु त्यांनी विश्वासघात केला. पंतप्रधानांनी 2 कोटी जणांना दरवर्षी रोजगार आणि 15 लाख रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तरुणांना रोजगार देण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी चिनी सामग्री विकली जात असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

मेड इन मंदसौर

5-7 वर्षांनी आम्हाला येथे ‘मेड इन मंदसौर’ लिहिलेले फोन आढळावेत असे माझे स्वप्न आहे. नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंग हे काम करू शकत नाहीत. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे काम करू शकतात, असे सांगत राहुल यांनी काँग्रेसच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन केले.