|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गव्यांच्या बंदोबस्तासाठी वनखाते राबविणार कोबिंग ऑपरेशन

गव्यांच्या बंदोबस्तासाठी वनखाते राबविणार कोबिंग ऑपरेशन 

प्रतिनिधी /वाळपई :

बुधवारी सकाळी सत्तरी तालुक्यातील कणकीरे भागात जयंती गावकर यांच्यावर हल्ला करून तिच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या गवारेडय़ामुळे या भागातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गव्यापासून धोका असल्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यानंतर वनखात्याने गव्यांच्या बंदोबस्तासाठी लवकरच कोबिंग ऑपरेशन हाती घेण्याचे जाहीर केले आहे. वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी कुलदीप शर्मा यांनी गुरुवारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सदर घटनेबाबत खेद व्यक्त करून त्यांनी गावकर कुटुंबाला वनखात्याकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गवारेडय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी

जयंती गावकर यांच्यावर हल्ला करणारा हा गवारेडा पुन्हा माणसांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. कणकीरे हा भाग जंगलाने वेढलेला असून येथे गव्यांचे प्रमाणही गेल्या काही वर्षात वाढले आहे. नेहमीच या भागातील ग्रामस्थांच्या शेतीचे नुकसान करणारे हे गवे आता मानवी वस्तीत घुसू लागल्याने गाव भीतीच्या छायेखाली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या हृदयदावक घटनेमुळे संपूर्ण गावावर आघात कोसळला असून या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी कणकीरेत दाखल झालेल्या वनअधिकारी शर्मा यांच्याकडे केली.

येत्या दोन दिवसात कोबिंग ऑपरेशन : कुलदीप शर्मा

जयंती गावकर यांच्यावर हल्ला करणारा गवारेडा उन्मत्त बनला असल्याने त्याच्यापासून धोका आहे. गावातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे. काजूबागायतीत अथवा जंगलभागातून जात असताना या गव्यापासून उपद्रव होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना यावेळी वनअधिकारी कुलदीप शर्मा यांनी ग्रामस्थांना केली. वनखात्यातर्फे या भागातील गव्यांच्या वास्तवाचा शोध घेतला जाईल. यासाठी कोबिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात येथील जंगलव्याप्त भागात खास कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याद्वारे त्यांच्या वास्तव्याचा शोध घेतला जाणार असून त्यानंतर त्यांना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असेही शर्मा म्हणाले.