|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनांना परवानगी

प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनांना परवानगी 

परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने यांचे आदेश

रत्नागिरी बसस्थानकातून सुटल्या शेकडो खासगी गाडय़ा

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्याय

प्रतिनिधी /रत्नागिरी

एस. टी. कर्मचारी अघोषित संपावर गेल्याने हजारो प्रवाशांचे शुक्रवारी दुपारपर्यंत हाल झाले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने यांनी खासगी वाहतुकीला परवानगी दिली. इतकेच नव्हे तर ही वाहतूक एस.टी.बसस्थानकातून सुरू करण्यात आली. त्यामुळे अखेर प्रवाशांना खासगी वाहतुकीने आधार दिला आणि शुक्रवारी सायंकाळची प्रवाशांची गैरसोय टळली.

100 टक्के संप पुकारल्याने शुक्रवारी दुपारनंतर प्रवाशांची गैरसोय झाली. यावर जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठकही झाला. प्रत्येक जिल्हय़ातील संपाचा आढावा परिवहन उपायुक्तांनी घेतला होता. रत्नागिरी जिल्हय़ातील परिस्थिती आरटीओ विनोद चव्हाण यांनी परिवहन विभागाकडे कळविली होती. त्यानंतर तातडीने परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने यांनी प्रत्येक बसस्थानकातून खासगी वाहतूक सुरू करा. खासगी वाहनधारकांना संपर्क करून त्यांना वाहतुकीसाठी परवानगी द्या, अशा लेखी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दुपारनंतर प्रत्येक डेपोतून खासगी वाहतूक सुरळीपणे सुरू करण्यात आली.

संप मागे घेईपर्यंत खासगी वाहतूक सुरू ठेवणार

खासगी वाहतुकीमुळे सायंकाळी कामावरून परतणाऱया कामगारांची गैरसोय टळली. खासगी वाहतुकीचे नियोजन सुरळीत करण्यासाठी स्वतः आरटीओ विनोद चव्हाण व त्यांची टीम मुख्य बसस्थानकात कार्यरत होती. आरटीओ कार्यालयातील काही अधिकारी जिल्हय़ातील इतर बसस्थानकातही कार्यान्वित होते. जेणेकरून प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घेता आला. जोपर्यंत संप मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत ही खासगी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी खासगी बसेस, टॅक्सी व इतर वाहनांची मदत घेण्यात आली आहे.