|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दोन दिवसात दीड कोटींवर पाणी

दोन दिवसात दीड कोटींवर पाणी 

प्रतिनिधी/ सांगली

गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱयांच्यामुळे एसटीला चांगलाच दणका बसला आहे. सांगली विभागाला दोन दिवसात एसटीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. कर्मचाऱयांविना एसटी प्रशासनाला दिवसभरात 1 हजार 769 फेऱया रद्द कराव्या लागल्या. संपावर दुसऱया दिवशीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरुच आहे. दरम्यान, जिह्यात पाच ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये चालकांसमोरील काचा फुटल्या, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. एसटी वाहतूक ठप्प असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. खासगी ट्रव्हल्स, वडापमुळे प्रवाशांची काही प्रमाणात सोय झाली, मात्र दुप्पट-तिप्पट दरामुळे प्रवशांना नाहक भुर्दंडही सोसावा लागला.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संपाचे हत्यार पुकारले आहे. यामुळे एसटी वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिह्यात एसटीचे दहा डेपो आहेत. दहाही ठिकाणी कर्मचाऱयाविना एसटी वाहतूक बंद होती. केवळ शिवशाहीच्या फेऱया सुरु आहेत. शुक्रवारी दिवसभर एसटी सेवा ठप्प होती. शनिवारी दिवसभर अशीच परिस्थिती राहिली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. याशिवाय एसटी प्रशासनालाही प्रचंड नुकसानकीला सामोरे जावे लागले.

1769 फेऱया रद्द

शनिवारी दिवसभरात कर्मचाऱयांविना एसटी प्रशासनाला तब्बल 1 हजार 769 फेऱया रद्द कराव्या लागल्या. सांगली व मिरज मधील शहरी बस वाहतूक सेवा शनिवारी दिवसभर पूर्णपणे बंद होती. त्यामुळे सहा आसनी रिक्षांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागला. मिरज ग्रामीण, इस्लामपूर, तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी विभागात एसटीची तुरळक सेवा सुरु होती. विटा, जत, वाळवा, शिराळा व पलूस डेपोमधून शनिवारी दिवसभरात एकही एसटी बाहेर निघाली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱया वडापच्या वाहनांचा प्रवाशांना आधार घ्यावा लागला. त्यामुळे ग्रामीण भागात वडापचालकांची चांगलीच चांदी झाली.

दीड कोटींवर पाणी

कर्मचाऱयांच्या संपामुळे सांगली विभागाला दोन दिवसात सुमारे दीड कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. शुक्रवारी 60 लाख तर शनिवारी 70 लाख रुपयांचे नुकसान झाले. तोटय़ात असणाऱया विभगाला कर्मचाऱयांच्या संपामुळे चांगलाच दणका बसला आहे. शुक्रवारी संपाची कल्पना नसल्याने सांगली बसस्थनकावर प्रवाशांची गर्दी पहायला मिळत होती. मात्र शनिवारी दिवसभरात प्रवाशांची तुरळक गर्दी होती. संप मिटणार नाही याची कल्पना असल्याने अनेकांनी प्रवासाचा बेत रद्द केला. तर अनेक प्रवाशांली खासगी ट्रव्हल्स, वडाप तसेच रेल्वेचा आधार घेतला. दुपारी सांगली स्थानकातून कोल्हापूर तसेच इस्लामपूर या मार्गावर काही बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळाला.

पाच ठिकाणी दगडफेक

शनिवारी दिवसभरात जिह्यात पाच ठिकाणी एसटी वर दगडफेक करण्यात आली. चालकाच्या समोरील काचा फोडण्यात आल्या. यामध्ये एसटीचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. आटपाडी ते सांगली या एसटीवर कुमठा फाटा येथे अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये चालकासमोरील काच फुटली. कवठेमहांकाळ ते तासगाव या एसटीवर शिरढोण, सांगली ते तासगाव एसटीवर कुमठा फाटा येथे, सांगली ते आटपाडी एसटीवर पुणदी फाटा तर स्वारगेट ते सांगली या शिवशाही बसवर वाळवा फाटा येथे समोरुन अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये चालकासमोरील काचा फुटल्या, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

विभाग नियंत्रक ‘स्विच ऑफ’

संपाची तीव्रता वाढत असताना सांगली विभागाच्या विभगा नियंत्रक अमृता ताम्हणकर यांचा मोबाईल मात्र दिवसभर स्विच ऑफ होता. त्यामुळे सायंकाळी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. फोन लागला मात्र त्यांनी तो उचलला नाही. संपाबाबत मा†िहती घेण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधत होते, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधीसह काही प्रवाशांनीही ताम्हणकर यांच्याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.

बस स्थानकाला कडेकोट बंदोबस्त

संपाच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सांगली बस स्थानकावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शुक्रवारी वडाप तसचे खसगी प्रवाशी वाहतूकदार व एसटी कर्मचाऱयांच्यामध्ये खटका उडाला होता. त्यामुळे पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतली होती. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱया वडाप गाडय़ांना बस स्थानकापासून चार हात लांबच ठेवले होते. यामुळे शनिवारी दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

दडपशाही खपवून घेणार नाही

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी पगार वाढीसाठी सुरु केलेला संप योग्यच आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील कर्मचाऱयांपेक्षा दुप्पट मानधन दिले जाते. अत्यंत तुटपुंज्या पगारामध्ये कर्मचारी काम करतात. तरीही शासन कर्मचाऱयांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न आहे. यापुढे दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी महासंघ एसटी कर्मचाऱयांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभा राहील. प्रसंगी या संपामध्येही सहभागी होईल.