|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाढीव वीजबिलाने नागरिक हैराण

वाढीव वीजबिलाने नागरिक हैराण 

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक विद्युत मंडळातर्फे 1 एप्रिलपासून राज्यात दरवाढ केली आहे. परंतु त्या दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही दरवाढ काही काळ थांबविण्यात आली होती. आता जून महिन्यात एप्रिल व मे महिन्यातील वाढीव वीज बिल आले असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

दरवर्षी एप्रिल महिन्यात केईआरसीकडून विजेची दरवाढ करण्यात येते. यावषीही राज्यातील सर्व पुरवठादार कंपन्यांनी आपले वाढीव दर केईआरसीकडे पाठविले. ही दरवाढ अंतिम टप्प्यात असतानाच आचारसंहिता जाहीर झाल्याने दरवाढ प्रलंबित पडली होती. परंतु आचारसंहिता संपताच हेस्कॉमने प्रतियुनिट 25 ते 30 पैसे वीजबिलात वाढ केली आहे.

सध्या जून महिना असला तरी दरवाढीची रक्कम ही एप्रिल महिन्यापासूनच घेतली जात आहे. त्यामुळे जून महिन्यात वाढीव वीज बिल आल्याने नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. या महिन्यात त्यांना मागील महिन्याच्या वीज बिलाबरोबरच एप्रिल महिन्यापासूनच्या वाढीव दरवाढीची रक्कमही भरावी लागत आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजी क्यक्त होत आहे.

हेस्कॉमवर तक्रारींचा भडिमार

वाढीव वीज बिल आल्याने नागरिक थेट हेस्कॉम कार्यालयात जाऊन बिल अधिक का आले? याची विचारणा करत आहेत. कर्मचाऱयांना हे दरवाढीने बिल वाढले असल्याची माहिती द्यावी लागत आहे. त्यामुळे हेस्कॉम कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.