|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हाभरात पावसाने दाणादाण

जिल्हाभरात पावसाने दाणादाण 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अजूनही विश्रांती घेतली नसून रत्नागिरी जिल्हाभरात पडणाऱया मुसळधार पावसामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे-फणसवळे भागात नदीला पूर आल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले. चिपळुणात दरडी, झाडे कोसळून मार्ग बंद पडले. तर वालोपेत डोंगर खोदाईची माती घरात घुसून मोठे नुकसान झाले. राजापुरात  कोदवली व अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून शहरात पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. संगमेश्वरात कोळंबे गावातील आंबेकरवाडीला भूस्सखलनाचा धोका वाढल्याने 15 घरातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच खेड, दापोली, मंडणगड, लांजासह गुहागरातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. जिल्हय़ात रविवारी एकूण 1155 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

 रत्नागिरीतील अनेक भाग पाण्याखाली

रविवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपल्याने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेला होता. मुख्य बाजारपेठेसह शहरालगत असणाऱया कुवारबाव येथे पाणी साचल्याने अनेक दुचाकी गाडय़ा पाण्याखाली गेल्या. कासारवेली, कोतवडे, नेवरे, भांडारपुळे, टेंबेपूल, गावखडी, बसणी आदी परिसर जलमय झाला होता. मारूती मंदिर परिसराह मिरजोळे येथील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच येथील रामआळीत मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते.

मिरजोळे-फणसवळे भागात नदीला पूर

येथील मिरजोळे-फणसवळे भागात नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. या पुलावरून पाणी जात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच येथील शिरगाव-गणपतीपुळे रस्त्यावर साखरतर पुलाच्या अलिकडे व गडगे स्टॉपच्या पुढे चढावात पावसामुळे मोठे दगड वहात रस्त्यावर आले आहेत.

 जिल्हय़ात 10 जून रोजी एकूण 1155.00 मिलीमीटर म्हणजेच सरासरी 128.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आकडे मिलीमीटरमध्ये आहेत.  मंडणगड- 53.00 , दापोली- 77.00, खेड- 58.00, गुहागर-14.00, चिपळूण-111.00, संगमेश्वर-85.00, रत्नागिरी -239.00, लांजा 187.00 व राजापूर तालुक्यात 205.00 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने अधिक पाऊस असल्यास कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

                     वालोपेत डोंगर खोदाईची माती घरात घुसून नुकसान

तालुक्यात ठिकठिकाणी झाडे व दरडी कोसळून मार्ग बंद पडले होते. मात्र प्रशासनाने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ही झाडे बाजूला केली. तसेच वालोपेत डोंगर खोदाईची माती चक्क घरात घुसून मोठे नुकसान झाले. मात्र या पावसाने रविवारी दुपारपासून उसंत घेतली होती. वालोपे येथे काही महिन्यांपूर्वी झालेल्या डोंगर खोदाईमुळे पावसाच्या पाण्याने ही माती सुनील देवळेकर यांच्या घरात घुसली. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रामपूर परिसरातही मुसळधारेमुळे उमरोलीतील नाला पाण्याने भरून वाहू लागल्याने हे पाणी चिपळूण-गुहागर मार्गावर आले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहनचालकांनी कुंभारवाडीमार्गे मार्ग काढत घर गाठले. रामपूर घाटातही दरड कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड आले.

राजापुरात कोदवली, अर्जुना नदीच्या पातळीत वाढ

शनिवारपासून पडणाऱया मुसळधार पावसाने राजापूर तालुक्याला झोडपले आहे. मुसळधारेने कोसळणाऱया पावसामुळे शहरातून वाहणाऱया कोदवली व अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून शहरात पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी दुपारी जवाहर चौकातील नदीकाठालगतच्या टपऱयांपर्यंत पाणी आले आहे. तर चिंचबाध येथील रस्त्यावर अर्जुना नदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पावसामध्ये सातत्य राहिल्यास रात्री पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शिळ, गोठणे-दोनिवडे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

 सोनवी, शास्त्राrनदीने धोक्याची पातळी ओलांडली

पावसामुळे सोनगिरी, रत्नागिरी-पांगरी, मांजरे रस्त्यावर दरड पडली असून वाहतूक धोकादायक बनली आहे. तसेच संगमेश्वरातील सोनवी व शास्त्राr नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी कोळंबे गावातील आंबेकरवाडीला भूस्सखलनाचा धोका वाढल्याने 15 घरातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले. त्यांना कोळंबे वसतिगृहात हलविण्यात आले आहे. तर माभळे काष्टेवाडीत चाफा व आंब्याचे झाड उन्मळून विद्युत तारेवर पडल्याने गावातील वीज खंडित झाली होती. कुरधुंडा येथील दरड खाली आल्याने मुंबई-गोवा महामार्ग काही वेळ बंद होता मात्र काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ओणनवसे शाळेचे पत्रे उडाले

शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आसूद ग्रामपंचायत हद्दीतील काजरेवाडीलगत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे काजरेवाडीतील 23 घरांना धोका निर्माण झाला असून त्यापैकी 5 घरे दरडीच्या अगदी नजीक असल्याने ती कधीही जमीनदोस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ओणनवसेतील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे पत्रे उडून सुमारे 3 लाख 53800 रूपयांचे नुकसान झाले आहे.

कशेडी घाटाजवळ दरड कोसळली

तालुक्यात रविवारी पहाटे 6 वाजल्यापासून दमदारपणे पडणाऱया पावसाची संततधार दुपारपर्यंत कायम होती. यामुळे चोरद, जगबुडी व नारिंगी नद्या पाण्याने भरून वहात होत्या. कशेडी घाटाजवळच्या स्वामी समर्थ मंदिरामागील दरड सकाळी 8 वाजता कोसळली. सुदैवाने यावेळी कोणीही भाविक दर्शनासाठी उपस्थित नसल्याने पुढील अनर्थ टळला.

वेलदूर-गुहागर रस्त्यावर दरड

पावसामुळे गुहागर तालुक्यात वेलदूर रस्त्यावर श्री धारदेवी मंदिरासमोर दरवर्षी दरड कोसळून हा रस्ता धोकादायक ठरत आहे. तसेच गुहागर तालुक्यातील आरे-चिंचवाडी रस्त्यावर बौद्धवाडीजवळील मोरी खचल्याने रस्ता वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एकंदर पावसामुळे पुरते जनजीवन विस्कळीत झाले आहे.