|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोतील अपहरणनाटय़ाने खळबळ

वास्कोतील अपहरणनाटय़ाने खळबळ 

प्रतिनिधि/ वास्को

दहा लाखांच्या खंडणीसाठी वास्कोतील व्यापाऱयाचे अपहरण केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना रविवारी न्यायालयात उभे करून आठ दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड घेण्यात आला. अपहरण आणि खंडणी प्रकरणी अटक करण्यात आलेले हे संशयीत आरोपी वास्कोतील ओळखीचेच चेहरे असल्याने वास्कोत हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यांचा अन्य गुन्हेगारी प्रकरणातही सहभाग असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

  शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आपले हार्डवॅअरचे दुकान बंद करून घरी पायी चालत जाणाऱया हरीश सोळंकी यांना अब्दुल कादर आणि त्याच्या साथीदारांनी पकडून इंडिका कारमध्ये कोंबून त्यांचे अपहरण केल्याचे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आले होते. त्यांनंतर सकाळपर्यत या प्रकरणाचा पोलिसांनी झोकून देऊन छडा लावला. मुरगाव व सालसेतसह सबंध दक्षिण गोव्यात नाका बंदी करून पोलिसांनी घेरल्याने अपहरण आणि खंडणीवर पाणी सोडून आरोपींनी आहे तेथून पळणे पसंद केले. त्यामुळे व्यापाऱयाचा जीव वाचला. आणि शेवटी तिघेही अपहरणकर्ते गजाआड झाले.

आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी

  अपहरण व खंडणीच्या या प्रकरणाने वास्कोत खळबळ उडवून दिलेली आहे. वास्कोत यापूर्वी अपहरण आणि खूनाच्या दोन मोठय़ा घटना घडलेल्या आहेत. या घटनांमुळे सबंध गोव्यात खळबळ माजली होती. ताज्या प्रकरणात पोलिसांनी वेळीच आरोपींना घेरल्याने व्यापारी हरीष सोळंकी यांचा जीव वाचला.   पोलिसांनी अटक केलेल्या या अपहरणनाटय़ाचा सुत्रधार अब्दुल कादर याच्यासह त्याचे साथीदार सालेम उमर खान व राजेंद्र कुमार या तिघांना रविवारी दुपारी न्यायालयात उभे करून त्यांच्यासाठी आठ दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड पोलिसांनी घेतला. हे तिघेही अपहरणकर्ते अन्य गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेले असण्याची शक्यता असून वास्को पोलीस या दिशेने तपास करीत आहेत.

आरोपी गुंड प्रवृत्तीचे, व्यवहारही संशयास्पद

   या आरोपीसंबंधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघेही गुंड प्रवृत्तीचे असून त्यांचे व्यवहार संशयास्पद आहेत. अब्दुल कादर हा हेडलॅण्ड सडय़ावरील मुळ गरीब कुटुंबातील युवक असून त्याचे वडिल सडय़ावरील नाक्यावर स्टोव दुरूस्तीचा व्यवसाय करायचे. आता मात्र, हा युवक एwषारामात जगत आहे. सध्या तो वाडे येथील सी विण्ड निवासी वसाहतीत राहतो. तो तायकोंडोपटूही आहे. त्यानेच व्यापारी हरीष सोळंकी याचे अपहरणनाटय़ रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

   दुसरा संशयीत आरोपी सालेम उमर खान हासुध्दा कुप्रसिध्द असून तो बाऊन्सर म्हणून काम करीत असतो. त्याचाही व्यवहार संशयास्पद आहे. तिसरा आरोपी राजेंद्र गिरीधरलाल कुमार हा व्यवसायाने ब्रोकर आहे. मात्र, या तिघांचे मिळून अन्य गैर धंदे असण्याचा संशय आहे.

इंडिका कारच्या चौकशीतून पोलीस आरोपींपर्यंत

  व्यापाऱयाचे अपहरण होऊनही सकाळपर्यत अपहरणकर्ते नक्की कोण याचा थांगपत्ता लागला नव्हता. रात्री दुकान बंद करून घरी जाताना या तिघांनी त्यांचे कारमध्ये कोंबून अपहरण केले. त्यांच्याच दुकानात काम करणारा अरविंद चौधरी हा थोडय़ा दूर अंतरावर होता. बुरखाधारकांनी सोळंकी याना कारमध्ये कोंबल्याचे त्याने पाहिले होते. परंतु ते कोण हे ओळखणे शक्य नव्हते. अपहरण झालेले सोळंकी यानाही आरोपींबाबत काहीच माहित नव्हते. मात्र, उतोर्डा येथे झाडीत टाकून दिलेली इंडिका कार आढळताच अपहरणकर्त्याचे बिंग फुटले. अपहरणासाठी वापरण्यात आलेली इंडिका कार मालकाकडून दुसऱयाकडे आणि दुसऱयाकडून तिसऱयाच व्यक्तीकडे पोहाचली होती. राजेंद्र कुमार या आरोपीने ही कार वापरण्यासाठी घेतली होती. कारमध्ये सापडलेल्या एका कागदामुळे पोलीस या कारशी संबंधीत व्यक्तीकडे पोहोचले. त्याने राजेंद्र कुमार याचे नाव सांगितले व आपण मुंबईला निघत असल्याचे त्याने आपल्याला फोनवरून सांगितल्याची माहिती त्या व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांना या आरोपीला थीवी रेल्वे स्थानकावर गजाआड करणे शक्य झाले. त्यानंतर त्यानेच अब्दुल कादर व सालेम उमर खान यांची नावे सांगितल्याने पोलिसांनी त्यांनाही गजाआड केले. कारची चौकशी होईपर्यत अपहरणकर्ते कोण असावेत याचा थांगपत्ता नव्हता.

अपहरण व खंडणीप्रकरणी चर्चेला ऊत

  मात्र, या तिघाही आरोपींचे फोटो काल रविवारी दिवसभर सोशल मिडियावर झळकू लागल्याने वास्कोत सर्वत्र चर्चेला ऊत आला. तिघाही अपहरणकर्त्यांचे चेहरे वास्कोतील बऱयाच नागरिकांना परीचयाचेच होते.