|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पदवीधर निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवा

पदवीधर निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवा 

राष्ट्रवादीची प्रचारसभा

सुनील तटकरेंचे आवाहन

प्रतिनिधी /चिपळूण

कोकण पदवीधर मतदार संघात पुरोगामी विचार सर्वापर्यत पोहचवून आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना विजयी करून गद्दाराना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे महासचिव सुनील तटकरे यानी सोमवारी येथे केले.

कोकण पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मुल्ला यांच्या प्रचारार्थ माटे सभागृहात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्यानी गेल्या चार वर्षात त्या स्वप्नांचा चक्काचूर केला. त्यामुळे जनतेला ‘अच्छे दिन’पेक्षा पूर्वीचे दिवस पुन्हा येवोत असे वाटत आहे. देशात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या पदरी आलेला पराभव याचीच प्रचिती देत आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य मतदार संघात केंद्रीय मंत्री गीतेंनी आपला उमेदवार पाचशे मतानी विजयी होईल असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. गीतेसाहेबांनी हीच आकडेमोड जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केली असती तर आज हे दिवस आले नसते, अशी टीकाही त्यांनी केली. कोकण पदवीधर निवडणुकीतही आघाडीचे उमेदवार मुल्ला यांचा विजय निश्चित आहे. मात्र त्यासाठी कार्यकर्त्यानी सध्याच्या सरकारचे शिक्षणविषयक चुकीचे धोरण आणि हानीकारक कार्यपध्दती सुशिक्षित मतदारांपुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले.

उमेदवार मुल्ला यांनी गेली पंधरा वर्षे ठाणे महानगरपालिका आणि कोकण मर्कन्टाईल बॅंकेच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती दिली. निवडून आल्यानंतर मिळणाऱया निधीचे वाटप समानपणे सर्व जिल्हय़ांना केले जाईल असे सांगतानाच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

यावेळी कॉंग्रेसचे इब्राहीम दलवाई, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, पंचायत समिती सभापती पूजा निकम, माजी सभापती शौकत मुकादम, सुचय रेडीज, शेकापचे शब्बीर अलवी, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, अनिलकुमार जोशी, युवक जिल्हाध्यक्ष डॉ. राकेश चाळके, टीडीएफचे भारत घुले, जमालुद्दीन बंदरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, तर सूत्रसंचलन अमित सुर्वे, यांनी केले.

दरम्यान, या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्यासह आघाडीची अनेक नेतेमंडळी गैरहजर होते.

Related posts: