|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » क्रिडा » ब्राझीलचा संघ रशियात दाखल

ब्राझीलचा संघ रशियात दाखल 

वृत्तसंस्था/ मॉस्को

नेमार आणि त्याचे संघसहकारी, ब्राझिलियन पथक सोमवारी पहाटे फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी रशियात दाखल झाले. रशियाला रवाना होण्यापूर्वी आपल्या शेवटच्या सराव सामन्यात त्यांनी ऑस्ट्रियाला 3-0 अशा एकतर्फी फरकाने पराभूत करत फॉर्म सिद्ध केला. या स्पर्धेदरम्यान ब्राझिलियन संघाचे वास्तव्य ब्लॅक सी रिसॉर्टवर असणार आहे.

ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार संघात परतल्यानंतर उत्तम बहरात दिसून आला असून व्हिएन्नाविरुद्ध गोल नोंदवत त्याने आपल्या करिष्म्याची एक झलक दाखवली. तब्बल तीन महिन्यानंतर त्याचा हा पहिलाच गोल ठरला. नेमारने ब्राझीलतर्फे नोंदवलेला हा 55 वा गोल ठरला. ब्राझीलकडून सर्वाधिक गोल नोंदवणाऱया खेळाडूंच्या यादीत त्याने आता रोमारिओशी बरोबरी साधली. या उभयतांपेक्षा आता फक्त पेले व रोनाल्डो यांचेच अधिक गोल आहेत.

नेमारसह गॅब्रिएल जेसस व फिलीप कॉटिन्हो यांनी देखील यावेळी प्रत्येकी एक गोल केला. नेमारला यापूर्वी मार्च महिन्यात पायावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली होती. 

ब्राझीलचा यंदा ई गटात समावेश असून स्वित्झर्लंडविरुद्ध पुढील रविवारी ते आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतील. त्यानंतर कोस्टारिका व सर्बियाविरुद्ध त्यांच्या उर्वरित दोन लढती होणार आहेत.