|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तर शैक्षणिक संस्थांसह दुकांनाना टाळे ठोकणार

तर शैक्षणिक संस्थांसह दुकांनाना टाळे ठोकणार 

प्रतिनिधी/ गोडोली

शहरात विविध शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून काही शैक्षणिक संस्था ठराविक दुकानातूनच गणवेश खरेदीची सक्ती करत आहेत. ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर आहे. संबंधित शैक्षणिक संस्था आणि दुकानांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही त्या संस्था आणि दुकानांना टाळे ठोकू, असा इशारा सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या रेश्माताई शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सन 2019 च्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालये ठराविक अशा दुकानांमधून विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होऊ लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक शाळेने आपले एक दुकान फिक्स केले आहे. निर्मला कॉन्व्हेंट या शाळेबद्दल देखील तक्रारी आल्या आहेत. सक्ती करणाऱया शैक्षणिक संस्था आणि कपडय़ांच्या दुकानांवर धडक कारवाई करावी, येत्या आठ दिवसामध्ये अशा शैक्षणिक संस्था, कपडय़ांच्या दुकानांवर कारवाई न झाल्यास टाळे ठोक आंदोलन केले जाईल, या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संदीपभाऊ शिंदे, सोमनाथ बोभाटे, प्रविण अहिरे, संजू रणखंबे, कृष्णात घोरपडे, माणिकराव घोरपडे, संभाजी आवळे, यदू शेडगे, पवन शेलार, चेतन घोरपडे, साईनाथ अहिरे, बळी वाघमोडे, मयूर कांबळे, नरेंद्र बर्गे, सरगडे उपस्थित होते.