|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » पदार्पणाच्या कसोटीत अफगाणचीच ‘कसोटी’ लागणार

पदार्पणाच्या कसोटीत अफगाणचीच ‘कसोटी’ लागणार 

भारताविरुद्धची एकमेव कसोटी लढत उद्यापासून बेंगळूरमध्ये,पाहुण्या स्पिनर्सकडून कडवी झुंज अपेक्षित

वृत्तसंस्था/ बेंगळूर

बऱयाच कालावधीपासून युद्धाच्या झळा बसल्यामुळे क्रीडा क्षेत्रापासून दूर रहावे लागलेल्या अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये बऱयापैकी झेप घेतली असून त्यांनी आता कसोटी दर्जाही प्राप्त केला आहे. त्यांची पदार्पणाची ऐतिहासिक कसोटी भारताविरुद्धच होणार असून गुरुवारी त्याची येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. असगर स्टॅनिकझाय हा त्यांचा पहिला कसोटी कर्णधार आहे.

संघातील प्रत्येक सदस्याला संघर्षाला सामोरे जावे लागले असून परिस्थितीनेही ते ‘श्रीमंत’ भारतीय संघापेक्षा खुपच ‘गरीब’ आहेत. असे असले तरी केवळ दोन दशकाच्या कालावधीतच आम्ही कसोटी संघ बनण्याइतकी झेप घेतली असून आमची क्षमता दाखवून देण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरणार असल्याचे कर्णधार स्टॅनिकझायने म्हटले आहे. 2001 मध्ये आयसीसीने या राष्ट्राला आपल्यात सामावून मान्यता दिली होती. ‘कसोटीच्या प्रवासाची सुरुवात करतानाचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आणि सुखद आहे,’ अशी भावना स्टॅनिकझायने व्यक्त केली. 2009 मध्ये आयसीसीकडून वनडे आंतरराष्ट्रीय संघाचा दर्जा मिळाल्यापासून तो या संघाचा सदस्य आहे. ‘कसोटीत सर्वोत्तम मानांकन असलेल्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट असून जी संधी मिळालीय त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैयक्तिक आणि सांघिक स्तरावर सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा आमच्या प्रयत्न राहील,’ असेही तो म्हणाला.

80 व 90 च्या दशकात अफगाणमध्ये युद्धाचा संघर्ष सुरू झाल्यानंतर अनेकांना देश सोडून पळून जावे लागले आणि पाकिस्तानमधील निर्वासितांच्या कॅम्पमध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागला. याच कॅम्पमधून क्रिकेटची आवड वाढत गेली आणि आता त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर नवोदित संघांपेक्षा जलद प्रगती करीत कसोटी दर्जा मिळविण्यापर्यंत झेप घेतली आहे. या संघाकडे गोलंदाज रशिद खान हा 19 वषीय फिरकी गोलंदाज असून आपल्या कामगिरीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचेच लक्ष त्याने वेधून घेतले आहे. गेल्या मार्चमध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी मिळविणारा गोलंदाज होण्याचा मान त्याने मिळविला आणि सध्या तो टी-20 क्रिकेटमध्ये आयसीसीचा अग्रमानांकित गोलंदाज बनला आहे. यावर्षी झालेल्या आयपीएलमध्येही अफगाणच्या काही खेळाडूंनी भाग घेतला आणि रशिद खानने आपण सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक असल्याचे त्यात सिद्ध करून दाखविले. त्याने उपविजेत्या ठरलेल्या सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना 21 बळी मिळविले. या संघाने त्याला 1.4 दशलक्ष डॉलर्सला खरेदी केले होते.

‘माझ्या मते भारतापेक्षा आपल्या संघाकडे सरस फिरकी गोलंदाज आहेत,’ असे या संघाचा कर्णधार स्टॅनिकझायने सांगितले. रशिद खान, मुजीब उल रेहमान, मोहम्मद नबी, रेहमत शाह व झहिर खान हे त्यांचे फिरकी गोलंदाज आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अफगाणने प्रभावी प्रदर्शन केले आहे. पण आता पाच दिवशीय क्रिकेट खेळण्याचे दडपण झेलण्याची क्षमताही आपल्यात असल्याचे त्यांना सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. भारतीय वातावरण त्यांच्यासाठी फारसे अपरिचित नाही. कारण अफगाणमधील असुरक्षित परिस्थितीमुळे 2015 पासून ते भारतातच सराव करीत असून काही मालिकांही त्यांना भारतात खेळल्या आहेत.  अफगाणमधील स्थिती अजून धोकादायक असून गेल्या महिन्यात रशिद खानची मायभूमी असलेल्या जलालाबादमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी स्फोट झाल्याने आठ लोक मरण पावले आणि 45 जण जखमी झाले होते. ‘क्रिकेट हा अफगाणसाठी आनंद व अभिमानाचे साधन आहे. असे हल्ले हे शांतता, एकता व मानवता यांच्याविरुद्ध केलेले हल्ले आहेत,’ असे अफगाण क्रिकेट मंडळाचे प्रमुख अतिफ मशाल यांनी म्हटले आहे. ‘दहशतीची स्थिती असल्यामुळे आम्हाला शिक्षण मिळाले नाही आणि आमच्या पालकांनी आम्हा 12 भावंडांना घराच्या बाहेर जाऊन क्रिकेट खेळण्यावरही बंदी घातली होती,’ असे रशिद खानने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होत.

भारताकडे अश्विन, जडेजासारखे अनुभवी फिरकी गोलंदाज असल्याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकवलेल्या करुण नायरने स्टॅनिकझायने केलेल्या स्पिन सरसतेच्या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे. ‘त्यांनी अद्याप कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे त्याचे विधान अतिधाडसी असल्याचे मला वाटते. आमच्या स्पिनर्सनी आपली क्षमता यापूर्वीच दाखवून दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक काही सांगण्याची गरज नाही,’ असे करुण नायर म्हणाला. भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्मय रहाणे करणार असून अनुभवी संघ असल्याने या कसोटीत भारताचेच पारडे जड असणार आहे. आयर्लंड या संघालाही कसोटी दर्ज मिळाला असून त्यांनी आपल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानची बरीच दमछाक केली होती. तशा कामगिरीची पुनरावृत्ती अफगाणने केल्यास त्यांच्याकडून भारताला कडवा प्रतिकार होण्याची अपेक्षा केली जात आहे.

 

Related posts: