|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हय़ात 28ठिकाणी होणार जन सुविधा केंद्रे

जिल्हय़ात 28ठिकाणी होणार जन सुविधा केंद्रे 

विजय पाटील/ सरवडे

राज्य मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांना विशेषतः महिलांना स्वच्छता गृहाची गरज असते. अनेक किलोमीटरचा प्रवास करताना अडचणी येतात. यासाठी राज्यातील प्रमुख मार्गावर जन सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला. या महत्वपूर्ण योजनेची सुरूवात राधानगरी तालुक्यातील गैबी येथे जन सुविधा केंद्र उभारून करण्यात आली आहे. जिल्हय़ात प्रमुख मार्गावर 28 केंद्रे उभारण्याचा मानस असून संस्था, कंपनी अथवा सेवाभावी लोकांच्या सहकार्यातून त्याची पुर्तता केली जाणार आहे. संडास, मुतारी यासह महिलाबचत गटांना विक्री केंद्र किंवा उपहारगृह अशा स्वरूपाचे हे केंद्र मॉडेल असून स्थानिक महिला बचत गटाला या केंद्रातील स्टॉलची जागा मोफत दिली जाणार आहे. मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतील ही योजना राज्यातील प्रमुख मार्गावरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू केली जाणार असून  यासाठी खाजगी कंपन्या, व्यक्ती, बँका, वित्तीय व सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत असलेले मंत्री पाटील यांनी आपला वाढदिवस कार्यक्रमांनी साजरा न होता तो सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा हा उद्देश ठेवून चार वर्षापुर्वी वाढदिवसाला शुभेच्छा देताना घरातील जुनी रद्दी आणावी असे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातुन जमलेली रक्कम स्वयंसिध्दा या सामाजिक संस्थेसाठी वापरण्यात आली. त्यानंतरच्या वाढदिवसाला झाडे देण्याचे आवाहन करण्यात आले. जमलेली झाडे शहरातील चौका-चौकात लावून चौकाचे सुशोभिकरण करण्याबरोबर पर्यावरण जपण्यात आले. गतवर्षी वाढदिनी खते देण्याचे आवाहन करण्यात आले. जमलेली खते कोल्हापूर जिल्हय़ातील गरजू शेतकऱयांना वाटप करण्यात आली. यावर्षी महिलांच्यासाठी स्वच्छता गृहे बांधण्याचा संकल्प केला असून त्याची सुरवातही करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हय़ातील मुख्य मार्गावर गरजेच्या 28 ठिकाणी सुविधा केंदे उभारली जाणार असून त्यातील पहिले गैबी येथील जन सुविधा केंद्र लोकार्पित करण्यात आले आहे. या केंद्रात पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र संडास व मुतारी बांधण्यात येत असून शेजारी महिला बचत गटाच्या मालाला विक्री केंद्र सुरू करण्यासाठी स्टॉलची खोलीचाही समावेश आहे. गावची लोकसंख्या व रस्त्यावर असणारी रहदारी लक्षात घेवून या केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. महिलांच्या बचत गटांना विक्रीची जागा मिळावी यासाठी या केंद्रातील स्टॉल विना मोबदला वापरावयास दिला जाणार आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार कांही ठिकाणी केवळ संडास व मुतारी याची तर कांही ठिकाणी उपहार गृहासह उभारणी केली जाणार आहे. केंद्राची स्वच्छता राहण्यासाठी मानधनावर एका व्यक्तीची निवड केली जाणार आहे. तर केंद्राच्या देखभालीची जबाबदारी स्टॉल घेतलेल्या बचत गटावर सोपवली जाणार आहे.

Related posts: