|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नगराध्यक्षांवर थेट आरोपानंतर खडाजंगी

नगराध्यक्षांवर थेट आरोपानंतर खडाजंगी 

प्रतिनिधी/ देवगड

जामसंडे वेळवाडी सडा येथे माजी आमदार स्मिता वाघ यांच्या फंडातून करण्यात आलेल्या लघू नळयोजनेचा वापर एकच व्यक्ती बेकायदेशीर करीत असल्याच्या कारणावरून विरोधी नगरसेवक सुभाष धुरी यांनी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांच्यावर थेट आरोप केल्याने दोघांमधील जोरदार खडाजंगीने मंगळवारी झालेली देवगड-जामसंडे नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.

व्यासपीठावर नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उपनगराध्यक्ष संजय तारकर, बांधकाम सभापती विकास कोयंडे, आरोग्य व शिक्षण सभापती बापू जुवाटकर, महिला बालविकास सभापती विशाखा पेडणेकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ आदी उपस्थित होते. सुरुवातीलाच विरोधी गटनेते ए. वाय. जाधव यांनी सर्वसाधारण सभेस विलंब झाल्याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. नियमानुसार दोन महिन्यांच्या आत सभा घेणे आवश्यक असताना सभा वेळेत का घेतली जात नाही?, असा सवाल उपस्थित केला. यावर नगराध्यक्ष चांदोसकर यांनी उत्तर देताना म्हणाले, आचारसंहिता असल्याने विकासकामांचे निर्णय सभेत होणार नसल्याने सभा घेण्याबाबत जिल्हाधिकाऱयांचे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनानंतर सभा बोलविण्यात आली आहे, असे सांगितले.

नगराध्यक्ष व विरोधी नगरसेवकांमध्ये ‘तू-तू-मै-मै’

भाजप नगरसेवक सुभाष धुरी यांनी वेळवाडी सडा येथील अनधिकृत नळकनेक्शनचा मुद्दा उपस्थित करून त्यावर काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. याला नगरसेविका हर्षा ठाकुर यांनीही पाठिंबा देत नगराध्यक्षांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्याधिकारी यांनी या लघु नळयोजनेची माहिती जिल्हा परिषदेकडे मागविण्यात आली आहे. ही योजना नगर पंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नळयोजनेची माहिती मिळाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. मात्र, धुरी यांचे या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी या प्रकरणी नगराध्यक्ष चांदोसकर यांना टार्गेट केले. अनधिकृत नळकनेक्शन हे नगराध्यक्षांच्याच घरात असल्याचा गंभीर आरोप केल्याने नगराध्यक्ष चांदोसकर व धुरी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अखेर मुख्याधिकारी यांनी याबाबत सखोल माहिती घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर या विषयावर पडदा टाकण्यात आला.

नागरी सुविधा केंद्र सोमवार, गुरूवारी पूर्ण दिवस सुरू ठेवा

जामसंडे येथील न. पं. चे नागरी सुविधा केंद्र दर सोमवारी व गुरुवारी जनतेसाठी पूर्ण दिवस खुले ठेवण्यात यावे. जेणेकरून मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांसाठी सोयीचे होईल तसेच स्थानिकांनाही दुपारनंतर आपली देयके भरणे सोपे होईल. त्यामुळे सुविधा केंद्र ते दोन दिवस पूर्ण दिवस सुरू ठेवावे, अशी मागणी नगरसेवक राजेंद्र वालकर यांनी केली. तसेच नळयोजना पाईपलाईनेचे अर्धवट ठेवलेले काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही वालकर यांनी केली.

पालकमंत्र्यामुळे रखडली दलितवस्तीची कामे

देवगड-जामसंडे न. पं. मधील दलितवस्ती सुधार योजनेतील कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. निधीही उपलब्ध आहे. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर यांची बैठक झालेली नसल्याने ही कामे मजूर झालेली नाहीत, अशी माहिती नगराध्यक्षांनी देताच विरोधी गटनेते जाधव यांनी नाराजी व्यक्त करून पालकमंत्र्यांना पत्र पाठविण्यात यावे, अशी मागणी केली.

घाटे पेट्रोलपंपासमोर नळयोजनेच्या पाईपलाईनची खोदाई करून ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतुकीस धोका होणार आहे. खोदाई करून दोन महिने झाले तरी खड्डा बुजविण्यात आलेला नाही. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल नगरसेविका हर्षा ठाकुर यांनी उपस्थित केला.

स्ट्रीटलाईट बंदावस्तेत

देवगड-जामसंडे मार्गावर लावण्यात आलेल्या स्ट्रिटलाईट बंद अवस्थेत आहेत. याबाबत काय कारवाई केली? असा सवाल नगरसेवक नीरज घाडी यांनी उपस्थित केला. यावर संबंधित ठेकेदाराला पत्र पाठविण्यात आलेले आहे. त्यांच्या 10 टक्के रक्कम न. पं. कडे जमा आहे. त्यांच्याकडून स्ट्रीटलाईटची कामे करून घेतली जातील, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

Related posts: