|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सेरुला कोमुनिदादमध्ये 200 कोटीचा जमीन घोटाळा

सेरुला कोमुनिदादमध्ये 200 कोटीचा जमीन घोटाळा 

प्रतिनिधी/ पणजी

सेरुला कोमुनिदादमध्ये 200 कोटी रुपयांहून अधिक जमीन घोटाळा झाला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. कोणतेही सोपस्करपूर्ण न करता कोमुनिदादीची जमीन बेकायदेशीररित्या कोटय़वधी रुपयांना विकून टाकली आहे. त्यात इमारतीही उभारण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर बेकायदेशीररित्या उभारलेल्या इमारतींवर कर्जही काढण्यात आले आहे. याबाबत गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस (सीआयडी) तपास करीत आहेत.

बेकायदेशीररित्या विकण्यात आलेल्या सेरुला कोमुनिदादमधील 25 प्लॉटाबाबत 2017 साली गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) तक्रार दाखल करण्यात आली होती. सीआयडी पोलिसांनी अनेकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्या तक्रारींच्या तपासकामा दरम्यान सीआयडी पोलिसांनी काल मंगळवारी म्हापसा उपजिल्हाधिकारी अधिकाऱयांच्या कार्यालयावर छापा मारून काही फाईल्स जप्त केल्या आहेत. मंगळवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत उप जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयात तपासकाम करण्यात आले आहे. केवळ 25 प्लॉटपर्यंत हे प्रकरण मर्यादीत नसून हा सेरुला कोमुनिदाद म्हणजे एक महा घोटाळा असून या जमिनी कोटय़वधी रुपयांना बिगर गोमंतकीयांना विकण्यात आल्या आहेत.

राजकीय नेते, अधिकारी गुंतले

या जमीन घोटाळा प्रकणात अनेक राजकीय नेते, सरकारी अधिकारी तसेच अनेक मोठय़ा व्यक्तींचे हात गुंतलेले आहेत. अनेकजण या प्रकरणाबाबतचे पुरावे नष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या प्रयत्न करीत आहेत. ज्या 25 प्लॉटबाबत सीआयडी पोलीस तपास करीत आहेत, त्यापैकी केवळ तीन प्लॉटांच्या सनद फाईल्स मिळतात तर इतर प्लॉटांच्या सनद फाईल्स नसल्याचे आढळून येत आहे. संशयितांकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत, मात्र या फाईल्स गायब झाल्याचे पोलिसांना उत्तर मिळत आहे. जर या फाईल्स गायब झाल्या असतील तर त्या फाईल्स कोणी व का गायब केल्या असतील, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

सगळाच कारभार बेकायदेशीर

वास्तविक एखाद्या व्यक्तीला कोमुनिदादमध्ये प्लॉट घ्यायचा असल्यास त्याला अनेक सोपस्कर पूर्ण करावे लागतात. जो प्लॉट घ्यायचा आहे त्याची एक विशेष फाईल तयार केली जाते. त्यात प्लाटबाबत सविस्तर माहिती नमुद केली जाते. नंतर ती फाईल महसूलमंत्र्यापर्यंत पोचते. सर्वसंबंधीत अधिकारी तसेच कोमुनिदादच्या समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर प्लॉटची तात्पुरती मालकी दिली जाते. काही रक्कम स्विकारली जाते. ठरावीक वेळेत सदर प्लॉटमध्ये बांधकाम न झाल्यास तो प्लॉट कोमुनिदाद परत घेऊ शकते. सेरूला कोमुनिदादमधील प्लॉट देताना कोणतीही फाईल तयार केलेली नसल्याचे उघड झाले आहे. एखादा प्लॉट ज्याला ज्या दरात पाहिजे त्या दरात देण्यात आला असून त्यांना एक नाममात्र पावती देण्यात आली आहे. एकूणच सगळाच कारभार हा बेकायदेशीररित्या केल्याचे उघड झाले आहे.

व्यवहाराची ना पावती ना कागदपत्रे

काही जणांना बेकायदेशीररित्या जमिनी देण्यात आल्या आहेत. काही जणांकडून लाखो रुपये घेण्यात आले, मात्र त्यांना जमीनही नाही आणि त्यांचे पैसेही परत मिळत नाहीत, अशी त्यांची स्थिती झाली आहे. ज्यावर्षी पैसे घेतले ते वर्ष किंवा तारीख पावतीवर नमुद न करता 10 वर्षे मागील तारीख पावतीवर नमुद करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे देणाऱयांनी जी पावती देण्यात आली होती तीही मान्यताप्राप्त नसल्याचे आढळून आले आहे. सदर पावतीवर फाईल नंबर नाही तसेच कोमुनिदादचा शिक्काही नसल्याने ती पावतीच बनावट असल्याचे सिध्द होत आहे. एकूणच ज्यांनी बेकायदेशीररित्या पैसे दिले त्यांचे पैसेही बुडाल्यात जमा आहे.

वास्तविक कोमुनिदादच्या जमिनी या बेघर असलेल्या आणि ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांनाच दिल्या जातात. मात्र सेरुला कोमुनिदादमधील अधिकाधिक जमिनी या पैसेवाल्यांनाच देण्यात आल्या आहेत. देणाऱयांनी त्यात बऱयापैकी मलई गोळा केली असल्याचे उघड झाले आहे. अधिकाधिक बिगर गोमंतकीयांनीच इमारती उभारल्या असल्याचे दिसून येत आहे.

Related posts: