|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पिसुर्लेतील केटामाईन फॅक्टरीला टाळे

पिसुर्लेतील केटामाईन फॅक्टरीला टाळे 

प्रतिनिधी/ वाळपई

केंद्र सरकारच्या महसूल दक्षता खात्याने पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमधील विनावापर असलेल्या फॅक्टरीवर सोमवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत टाकलेल्या छाप्यात 100 किलो केटामाईन जप्त केल्यानंतर मंगळवारी सकाळी फॅक्टरीला टाळे ठोकण्यात आले आहे. सलग 16 तास ही प्रक्रिया सुरू होती. केटामाईनची किंमत चार कोटी आहे. याप्रकरणी सहा संशयितांना तपास पथकाने ताब्यात घेतले आहे.

तब्बल सोळा तास चाललेल्या या छाप्यात तपास पथकाने अनेक संबंधितांना बोलावून घेऊन त्यांची कसून चौकशी केली. जबान्याही नोंद करून घेतल्या. त्यानंतर संशयावरुन सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. फॅक्टरीचे मालक वासुदेव परब यांनी आपण सदर फॅक्टरी एका पंजाबी इसमाला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिली असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. फॅक्टरीवर छापा टाकला तेव्हा केटामाईन पॅकिंगचे काम करणाऱया सहाजणांना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान नवनवीन माहिती उघड होत असून या प्रकरणी आणखी अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या केटामाईन व्यवसायाचे कळंगूट कनेक्शनही तपासात उघड झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

फॅक्टरीच्या सर्व खोल्या व मुख्य गेटला सील

फॅक्टरीचे गेट बंद करून पथकाने कमालीची गुप्तता ठेवत रात्री उशिरापर्यंत तपासणी केली. मध्यरात्रीनंतरही सकाळपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांनी अनेकांच्या जबान्या नोंद केल्या. यात काही स्थानिकांचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय महसूल दक्षता विभागाच्या या पथकाने स्थानिक पोलिसांना कारवाईदरम्यान कोणताही हस्तक्षेप करू दिला नाही. संपूर्ण कारवाईची माहिती गुप्त ठेवण्यात आली. मंगळवारी सकाळी 8 वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण करून या पथकाने फॅक्टरीतील सर्व खोल्यांना टाळे ठोकून सील केले. मुख्य दरवाजा व गेटही सील करण्यात आले आहे. फॅक्टरीमधील सर्व संशयास्पद सामान जप्त करून ते पर्वरी येथील दक्षता विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.

Related posts: