|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात स्मार्ट बसथांब्यांची उभारणी होणार

शहरात स्मार्ट बसथांब्यांची उभारणी होणार 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे होत असल्याने नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आहे. स्मार्टसिटी योजनेतील कामांना चालना मिळाली असून शहरात पाच ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त बसथांबे उभारण्याचा प्रस्ताव आहे. पाच ठिकाणी स्मार्ट बसथांबे उभारण्यात येणार आहेत. याकरिता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

शहरात बसने प्रवास करणाऱयांची संख्या मोठी आहे. हजारो प्रवासी बसने ये-जा करीत असतात. पण त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रवाशांना बस थांब्यावर बसण्यासाठी आसन सुविधा, पिण्याचे पाणी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात. तसेच ऊन आणि पावसात प्रवाशांना थांबावे लागते. काही बस थांब्यांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. ठिकठिकाणी पथदिपांची व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. काही बसथांब्यांवर भटकी जनावरे आणि मनोरुग्णांनी अतिक्रमण केले असल्याने प्रवाशांना थांबणे कठीण बनते. त्याचप्रमाणे बसथांब्यांवर नामफलक नसल्याने कोणत्या गावची किंवा उपनगराची बस थांबणार आहे, याबाबतची कोणतीच माहिती मिळत नाही. अशा अनेक समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो.

यामुळे शहरात स्मार्ट बसथांबे उभारण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. यापूर्वी बुडा आणि महापालिका प्रशासनाने अत्याधुनिक बसथांबे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणावे तितके यश आले नाही. आता स्मार्ट सिटी योजनेमधून अद्ययावत सुविधायुक्त बसथांबे उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. सध्या पाच ठिकाणी बसथांबे उभारण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या बसथांब्यांकरिता 1 कोटी 91 लाखाच्या निधीची तरतूद स्मार्टसिटी योजनेंतर्गत करण्यात आली आहे. बसथांबे उभारण्याकरिता कंत्राट मागविण्यात आले असून निविदाचे मूल्यांकन करण्यात येत आहे. यामुळे लवकरच बसथांबे उभारण्यात येणार आहेत.

Related posts: