|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कॉम्प्लेक्सच्या वाहनतळात पाणीच पाणी

कॉम्प्लेक्सच्या वाहनतळात पाणीच पाणी 

प्रतिनिधी/ वाळपई

वाळपई नगरपालिकेच्या शहरातील मार्केट प्रकल्पाच्या तळमजल्यावर असलेल्या पार्किंग जागेत पावसाचे पाणी साचल्याने पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. त्यातच तिथे पार्क केलेल्या वाहनांमध्ये पाणी गेल्याने त्या नादुरुस्त बनून लोकांचे नुकसानही झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या सातत्याने भेडसावत असतानाही पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शहरातील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी पालिकेने मार्केट कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर पार्किंगची सोय केली मात्र पावसाळ्य़ामध्ये सदर पार्किंग जागेत पाणी साचत असल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली आहे. येथे जास्त करुन दुचाकी चालक आपल्या गाडय़ा पार्क करतात. गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे येथे मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक दुचाकी चालकांना वाहने नादुरुस्त होण्याच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्पाच्या बाजूने गेलेल्या गटारांचा उपसा न केल्याने पाणी पार्किंगच्या जागेत असल्याचेही काहींनी सांगितले.

नगरपालिकेच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता वाहनतळावर साचलेले पाणी काढण्यासाठी पंपाची सोय करण्यात येणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.