|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हायवे पुलांच्या पिलरला झाडीने वेढले

हायवे पुलांच्या पिलरला झाडीने वेढले 

महामार्ग प्राधिकरणकडून पुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

वार्ताहर / कणकवली:

दोन वर्षांपूर्वी महामार्गावरील महाड येथे सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठा अपघात झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महामार्ग प्राधिकरणने सिंधुदुर्ग जिल्हय़ातील हायवेवरील पुलांच्या पिलरवर वाढलेली झाडी तोडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. मात्र, त्यानंतर वर्षभरानंतरच्या कालावधीत महामार्ग प्राधिकरणचे जिल्हय़ातील पुलांवर वाढलेल्या झाडीकडे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे अपघात झाल्यावर उपचार करण्यापेक्षा अपघातापूर्वी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणकडून संपूर्ण हायवेवर असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. हे करीत असताना पुलांच्या पिलरला वाढलेल्या झाडी तोडण्याकडे महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला होता. त्यानंतर रातोरात हायवेच्या पुलांवरील व पिलरला वाढलेली झाडी तोडण्यासाठी काम सुरू करण्यात आले. मात्र, अपघाताच्या आठवणी वर्षभरानंतर विस्मृतीत जात महामार्ग प्राधिकरण सध्या चौपदरीकरणाच्या कामाच्या पाठपुराव्यात आहे. मात्र, वाढलेली झाडी पुन्हा एकदा जर पिलर कमजोर करण्यास कारणीभूत ठरून मोठा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महामार्गावर चौपदरीकरणात काही पुले नव्याने हाती घेतली गेली आहेत. काही पुलांची कामे नव्याने सुरू असताना मात्र जुन्या पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. मात्र, जुन्या पुलांच्या देखभालीबाबत महामार्ग प्राधिकरणकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. नवीन पुलाचे काम सुरू असताना त्यापासून काही फुटांवर असलेल्या जुन्या पुलांच्या पिलरला वाढलेली झाडी महामार्ग प्राधिकरण व संबंधित एजन्सी डोळेझाक करीत नवीन पुलांचे काम सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्य़ात जर वाढलेल्या झाडींमुळे पिलरचा दगड निघून पिलरला धोका निर्माण झाला व मोठा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरण व संबंधित चौपदरीकरण एजन्सी घेणार का? असा सवाल सध्या जनतेतून केला जात आहे.