|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जुळय़ा मुलांची सख्ख्या मामानेच केली हत्या

जुळय़ा मुलांची सख्ख्या मामानेच केली हत्या 

हैदराबाद

: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मामाने मतिमंद असणाऱया जुळय़ा मुलांचा जीव घेतला आहे. या मुलांच्या देखभालीपासून बहिणीला सुटका मिळवून देण्याचा हेतू बाळगून भाचा-भाचीची त्याने हत्या केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

शहराच्या चैतन्यपुरी भागात शुक्रवारी रात्री उशिरा एका भाडय़ाच्या घरात मल्लिकार्जुन रेड्डीने 12 वर्षीय सृजना रेड्डी आणि तिचा जुळा भाऊ विष्णुवर्धन यांची गळा दाबून हत्या केल्याचे समजते. घरमालकाने आरोपी आणि त्याच्या दोन सहकाऱयांना मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवताना पाहिल्याने ही घटना उघडकीस आली. घरमालकाने माहिती दिल्यानंतर मल्लिकार्जुन, त्याचा मित्र वेंकटरमी रेड्डी आणि कारचालक विवेक रेड्डी यांना पोलिसांनी पकडले आहे.

मल्लिकार्जुनने नालगोंडा येथून शुक्रवारी या मुलांना आणले होते. मुलांना पोहणे शिकविणार असल्याचे त्याने बहिण लक्ष्मी आणि तिच्या नवऱयाला सांगितले हेते. मुलगा-मुलगी जन्मतःच मूकबधिर आणि मानसिकदृष्टय़ा दिव्यांग होती. आरोपीने गुन्हा मान्य केला असून बहिणीला या मुलांच्या देखभालीसाठी होणारा त्रास दूर करण्यासाठीच हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. मुलांच्या आईवडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास नकार दिला आहे.