|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर संचालकाचे अर्ज मंजूर

माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर संचालकाचे अर्ज मंजूर 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेले माजी आमदार दिलीप माने यांच्यासह इतर संचालकाचे अर्ज जिल्हाधिकाऱयांनी मंजूर केले आहेत.

बाजार समितीचे थकबाकीदार आहेत म्हणून माने, इंदुमती अलगोंडा-पाटील, अविनाश मार्तंडे, अशोक देवकते, सिध्दाराम चाकोते, गंगदे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी छाननीमध्ये बाद केले होते. यांच्या विरोधात वरील संचालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते. याबाबत 14 जून रोजी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला होता. त्यामुळे एकसदस्यीय प्राधिकरणाचा आदेश अमान्य असल्याबाबत उच्च न्यायलयात रिट पिटीशन दाखल केले होते. त्या आदेशाला स्थगिती दिलेली असून अपीलार्थी यांचे नॉमिनशन पत्रासंदर्भात केलेली कार्यवाही ही बाजार समितीच्या निवडणुकीपासून वंचित ठेवण्याच्या हेतूने केली असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे. तसेच 6 जून 2018 रोजीचा आदेश अपिलीय अधिकारी यांनी विचारात घेणे संदर्भांत निर्देश दिलेले होते. माने यांच्या वतीने ऍड. इंद्रजित पाटील व ऍड. वैभव देशमुख यांनी काम पाहिले.

बाजार समितीची निवडणूकीपूर्वीच सहकारमंत्री सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू होते. माने हे निवडणूकीपासून कसे लांब राहतील यांचा संपूर्ण आटोकाट प्रयत्न विरोधकांकडून झाला. परंतु माने हे विरोधकांच्या एक पाऊल पुढेच टाकत असल्यामुळे या लढाईत माने यांनी बाजी मारली आहे. माने यांनी न्यायालयीन लढाई जिंकल्यामुळे आता खरी लढत बाजार समितीच्या निवडणुकीची असणार आहे.

माने यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज या गावातून अर्ज दाखल केला आहे. तर अविनाश मार्तंडे यांचे नान्नज व पाकणी, इंदुमती अलगोंडा यांचे मंद्रुप, सिध्दाराम चाकोते कुंभारी व औराद मधून अशोक देवकते यांनी अर्ज दाखल केले आहेत. दिलीप माने आता निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना हे अडचणीचे ठरणार आहे.