|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तीन महिन्यांनंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक

तीन महिन्यांनंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक 

प्रतिनिधी/ पणजी

तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर आज सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रथमच मंत्रिमंडळ बैठक घेणार आहेत. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर व नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची बैठकीला उपस्थिती असणार नाही. मात्र उर्वरित दहा मंत्री बैठकीत सहभागी होतील. मंत्रिमंडळ बैठकीत विधानसभा अधिवेशनासंदर्भात चर्चा होणार आहे.

अमेरिकेतून उपचार घेऊन आल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर प्रथमच आज संध्याकाळी 5 वाजता मंत्रिमंडळ बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतील. फेब्रुवारी महिन्यापासून मुख्यमंत्री आजारी आहेत. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात ते अमेरिकेत गेले होते. मागील आठवडय़ात गुरुवारी ते गोव्यात परतले. त्यामुळे मध्यंतरी सुमारे तीन महिने राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नव्हती.

आज गोमेकॉत उपचार घेणार

सोमवारी सकाळी मुख्यमंत्री गोमेकॉत जाऊन उपचार घेतील. नंतर संध्याकाळी 5 वाजता मंत्रिमंडळ बैठक घेतील. या बैठकीत 19 जुलैपासून सुरू होणाऱया विधानसभा अधिवेशनाच्या वेळापत्रकारवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर अन्य काही महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सकाळी क्रांतीदिनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री करतात देवदर्शन

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या देवदर्शन करीत आहेत. काल रविवारी त्यांनी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. शुक्रवारी कामकाज सुरू करण्याअगोदर त्यांनी माशेल येथे जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतले होते व पणजीतील देवी महालक्ष्मीचेही दर्शन घेतले होते.