|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता… ग्राम पंचायतींमध्येही आधार केंदे

आता… ग्राम पंचायतींमध्येही आधार केंदे 

बेळगाव /प्रतिनिधी

आधार अपडेट केंदे आता ग्राम पंचायतीमध्येही सुरू करण्यात येणार आहेत. या आधी ठरावीक पोस्ट कार्यालयात आधार केंदे सुरू करण्यात आली होती. आता ग्राम पंचायतीमध्येही केंदे सुरू होणार असल्याने विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना आधार संबंधीत कामे ग्रा. पं. मध्ये जाऊन करता येणार आहेत. राज्य सरकारने यासाठी आधारच्या प्रत्येक अपडेटसाठी 10 ते 25 रुपयेपर्यंत शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रा. पं. कार्यालयात आधार अपडेट केंदे सुरू करण्यासाठी तेथील कर्मचाऱयांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणि लवकरच ही केंदे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जि. पं. चे सीईओ रामचंद्रन आर. यांनी दिली आहे. मात्र ग्रा. पं. मधील या आधार केंद्रामध्ये सीमित माहिती अपलोड करता येणार आहे. नाव, पत्ता, इ-मेल अपडेट करण्यासाठी एका कार्डाला 25 रुपये शुल्क निर्धारीत करण्यात आले आहेत. तर आधार संख्या शोधून देणे, माहिती तपासणी आणि रंगीत मुद्रणासाठी 20 रुपये तसेच कृष्ण-धवल मुद्रणासाठी 10 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. ही संग्रहीत झालेली रक्कम ग्रा. पं. निधीमध्ये जमा करण्यात येणार असून, त्याचा विनियोग करता येणार आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थिंना आधार संख्या जोडण्यासाठी ई- प्रशासनाच्या वतीने राज्यातील सर्व ग्रा. पं. मध्ये आधार केंदे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असणारी सर्व पूर्वतयारी करण्यात येत आहे. ग्रा. पं. च्या कर्मचाऱयांना विशेष प्रशिक्षण देऊन परीक्षाही घेण्यात आली आहे. येत्या आठवडय़ाभरात काही केंदे सुरू होण्याची शक्मयता असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले.

सध्या ग्रामीण भागातील जनतेला आधार कार्डशी संबंधीत समस्या असल्यास शहराकडे धावपळ करावी लागत आहे. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी ग्रा. पं. मध्ये आधार केंदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आहे. मात्र आधारकार्ड संबंधीत मोठी (गंभीर) समस्या असल्यास नाड कचेरीमधील आधार केंद्राकडेच जावे लागणार आहे, असे आधार केंद्राच्या अधिकाऱयांनी सांगितले.