|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » एसटीच्या 1148 नवीन कर्मचाऱयांना सेवामुक्त करणार

एसटीच्या 1148 नवीन कर्मचाऱयांना सेवामुक्त करणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांवर कारवाई सुरू आहे. नवीन भरती झालेल्या 1148 कर्मचाऱयांना सेवामुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कर्मचाऱयांचे अजून 180 दिवस देखील पूर्ण झालेले नाहीत. मात्र यांचा संपात सहभाग जास्त आढळून आला होता.

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱयांनी 8 जून रोजी संप पुकारला होता. दोन दिवस या संपात हे कर्मचारी सहभागी झाले होते. वारंवार संप केल्याने एसटी महामंडळाचं कोटय़वधी रूपयांचे नुकसान होते. त्यामुळे हे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील एसटीच्या वेगवेगळय़ा विभागांमध्ये कारवाई सुरु आहे. या कर्मचाऱयांच्या जागेवर जे उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये होते, त्यांना सेवेत घेतलं जाणार आहे. यामध्ये चालक, वाहक, तांत्रिक, लेखनिस यांचा समावेश आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये असणाऱया उमेदवारांना लॉटरी लागणार आहे. एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे दोन दिवसात 33 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. एसटी संपाच्या दुसऱया दिवशी एसटीचा 18 कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी 15 कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. दरम्यान, एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात सकारात्मक निर्णय झाल्यानंतर संप मागे घेण्याची घोषण करण्यात आली होती. कर्मचाऱयांवर करण्यात आलेल्या कारवाईवरही या बैठकीत तोडगा काढण्यात आला होता. मात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कर्मचाऱयांवर कारवाई केली जाईल, असे रावतेंनी स्पष्ट केले होते.

Related posts: