|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » किनारपट्टी भागात अक्षरशः ‘ढगफुटी’

किनारपट्टी भागात अक्षरशः ‘ढगफुटी’ 

घरांमध्ये घुसले पाणी :  अनेक भागांत रस्ते पाण्याखाली : देवगड तालुक्यात सर्वाधिक वृष्टी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळला. किनारपट्टी भागात तर पावसाने झोडपून काढल्याने काही लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याकडून पुढील एक दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा कायम आहे. दरम्यान, जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 129 मि. मी. च्या सरासरीने 1.036 मि. मी. पाऊस झाला आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक 275 मि. मी. एवढा विक्रमी पाऊस झाला.

जिल्हय़ात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागात कोसळलेल्या पावसामुळे घरे, गोठे, मंदिरामध्ये पाणी घुसले. त्यामुळे काही लोकांना स्थलांतरीतही करावे लागले. घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन वाहतूकही ठप्प झाली. महामार्गाचीही पावसामुळे दुर्दशा झाली आहे. चौपदरीकरणाच्या कामातील भरावाची माती रस्त्यावर आल्याने चिखल झाल्याने वाहन चालकांना कसरत करीतच प्रवास करावा लागतो.

म्हापण, परुळे पंचक्रोशीत ढगफुटीसदृश पाऊस

म्हापण : बुधवारी सकाळी म्हापण, खवणे, कोचरा, मेढा-निवती, मळई, केळुस आणि परुळे पंचक्रोशीत ढगफुटीसारखा तासभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे म्हापण-खालचावाडा येथील विठ्ठल मंदिर, तर खवणे-वरचावाडा येथे ओढय़ाला पूर आल्याने पाणी वस्तीत घुसून सात-आठ घरात शिरले. त्यामुळे भांडी व जीवनावश्यक धान्य, वस्तू वाहून गेले. म्हापण-निवती मार्गावरील खडपी-मायनेवाडी येथील पुलाचा काही भाग कोसळून वाहून गेल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

नव्याने तयार करण्यात आलेला खवणे-पागेरेवाडी बंदर रस्ताही पाण्यामुळे वाहून गेला आणि माती तेथील होडय़ांपर्यंत गेली. वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी यांनी बाधित गावांना भेट देऊन पाहणी केली. मळई, खवणे, पागेरे येथील कातळ भागात प्रचंड पाऊस झाल्याने ओढय़ांना पाणी येऊन पूरस्थिती निर्माण झाली.

म्हापण : खालचावाडा येथील विठ्ठल मंदिरात पुराचे पाणी घुसले. गौरेश ठाकुर

विठ्ठल मंदिरात पाणी घुसले

म्हापण-खालचावाडा येथील विठ्ठल मंदिरात या पुराचे पाणी दोन्ही दरवाजांतून आत घुसले. मंदिराच्या गाभाऱयातही पाणी गेले. विठ्ठल मंदिर थांब्यानजीकच्या आनंद ठाकुर यांच्या घरातही पाणी शिरले. तेथील ओढय़ाला पूर आल्याने वाहतूक खोळंबली होती.

खवणेत घरात पाणी घुसले

खवणे येथील वरचावाडा ओढय़ाला सकाळी नऊच्या सुमारास अचानक मोठा पूर आला. पुराचे पाणी ओढा ओलांडून वाडीतील घरांमध्ये शिरले. तेथील मातीच्या व अन्य घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील भांडी व धान्य, वस्तू वाहून गेल्या. इलेक्ट्रिक सामानाचे नुकसान झाले. सहदेव कोचरेकर यांची दुचाकी पाण्यातून दूरपर्यंत वाहून गेली. त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

तरुणांनी मुले-ज्येष्ठांना हलविले

पाणी अचानक वस्तीसह घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांची एकच तारांबळ उडाली. स्थानिक तरुणांनी धोका लक्षात घेऊन घरांमधील लहान मुले, महिला व वृद्धांना सुरक्षितस्थळी हलविले. कृष्णाजी गोपाळ कोचरेकर, शंभू नामदेव मोंडकर, रंजन विश्वास कोचरेकर, सचिन उत्तम कोचरेकर, सहदेव वामन कोचरेकर, गंगाधर दशरथ कोचरेकर, सत्यवान पांडुरंग कोचरेकर, बापू आत्माराम मोंडकर, नरेश गोविंद कोचरेकर व अन्य ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले.

म्हापण सरपंच अभय ठाकुर, उपसरपंच अशोक पाटकर, सदस्य संदीप खोत, रघुनाथ जुवाटकर, खवणे तलाठी रजनी कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सौ. कदम यांनी पंचनामा केला. मळई येथील कातळावरील वस्तीच्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात येऊन घरांच्या व मांगरांच्या पडवीत शिरून नुकसान झाले. केळुस-खुडास भागालाही अतिवृष्टीचा फटका बसला.

खडपी पूल धोकादायक!

अतिवृष्टीमुळे म्हापण-निवती मार्गावरील मायनेवाडी-खडपी येथील ओढय़ावरील पुलाचा काही भाग वाहून गेला. बीएसएनएलने मेढा-निवती ग्रामपंचायत नेट कनेक्शनने जोडण्यासाठी पुलावरून जेसीबीच्या सहाय्याने खंदक खणून केबल टाकली. त्यामुळे पुराच्या पाण्याने पुलाचा काही भाग उखडून वाहून गेला. तहसीलदार शरद गोसावी यांनी पाहणी करून बीएसएनएलच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नाराजी व्यक्त करीत म्हापण-निवती रस्ता खोदाईमुळे धोकादायक बनला आहे. तो तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. खडपीवाडीतील काही घरांमध्येही पाणी शिरून नुकसान झाले. कोचरा, पाट, परुळे येथेही अतिवृष्टी झाली.

देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस

देवगड : तालुक्यात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरण्याची घटना बुधवारी घडली. मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पावसाने कहरच केला होता. मिठमुंबरी येथील मधलीवाडी, खालचीवाडीतील शेत जमिनीत पाणी भरल्याने तेथील आजुबाजूच्या घरातही पाणी शिरण्याची घटना घडली. देवालय परिसरातही पाणी साचण्याची घटना घडली. जामसंडे भटवाडी येथे घराचे नुकसान झाले तर दहीबाव रस्त्यावर दरडीची माती कोसळल्याने मार्ग बंद पडला होता.  मिठमुंबरी येथील शेत जमिनीत पाणी भरल्यामुळे तेथील मधलीवाडी व खालचीवाडी येथील काही घरांमध्ये पाणी शिरले. तर श्री देव मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिर परिसरातही पाणी शिरल्याची घटना घडली. दाभोळे पाटथर येथील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे पहाटेपासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत कुणकेश्वरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. जामसंडे भटवाडी येथील मधुकर अनंत चिंदरकर यांच्या घराचे नुकसान झाले. महसूल विभागाच्यावतीने पंचनामा करण्यात आला असून सुमारे 19 हजार 100 रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड-निपाणी महामार्गातील कट्टा ते जामसंडे या रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे वाहन चालकांना रस्ताच दिसेनासा झाला आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे पाणी भरण्याची घटना घडली आहे. कुणकेश्वर दहीबाव या मार्गात दरडीची माती रस्त्यावर कोसळल्यामुळे येथील रस्ता बंद पडला होता.

मालवण : मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते. राजेश पारधी

आडारीत रस्त्यावर दगड आल्याने वाहतूक बंद

मालवण : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी मालवण तालुक्याला झोडपून काढले. सकाळी सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत सुरू होता. सतत कोसळणाऱया पावसामुळे शहर परिसरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. बंदरजेटी, रॉकगार्डन परिसरात समुद्राच्या जोरदार लाटा धडकत होत्या.

मेढा येथे काहींच्या घरात पाणी घुसले. खैदा येथे मुख्य रस्त्यावर दरडीसह झाड कोसळले. मेढा येथे माडाचे झावळ पडून वीज वाहिन्या तुटल्या होत्या. देवबाग मोंडकरवाडीत आंब्याचे झाड रस्त्यावर पडले होते. त्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. आडारी येथे डोंगराची माती व दगड रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता.

आचऱयात पाणीच पाणी

आचरा वार्ताहर कळवितो, खाडीलगतचा परिसर जलमय झाला होता. हिर्लेवाडी येथील काही शेतकऱयांचे नांगर वाहून जाण्याची घटना घडली. पारवाडी येथील वस्तीलगत पाणी आल्याने घरांना धोका निर्माण झाला होता. पण बुधवारी सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने धोका टळला. पारवाडी येथील आपकर, गावडे यांच्या घरालगत पाणी आल्याने येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते. पण बुधवारी सकाळी पावसाने उसंत घेतल्याने धोका टळला.

हिर्लेवाडी अंगणवाडीत पाणी

हिर्लेवाडी अंगणवाडीचे छप्पर नादुरुस्त झाल्याने अंगणवाडीत पाणी साचले होते. होते. त्यामुळे मुलांची गैरसोय टाळण्यासाठी आचरा उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, अंगणवाडी सेविका कांचन पांगे, ग्रामस्थांनी तातडीने लगतच्या हिर्लेवाडी विकास मंडळाच्या सार्वजनिक जागेत तात्पुरती व्यवस्था केली.

फणसवडेत वाहतूक ठप्प

ओटवणे : फणसवडे येथील मुख्य मार्गावर बुधवारी पहाटेच्या सुमारास वीज वाहिनीवर झाड कोसळल्याने दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे झाड कोसळले. त्यामुळे सुमारे आठ तास वाहतूक ठप्प होती. वायरमन प्रमोद हनपाडे यांनी वीजपुरवठा बंद केला. पं. स. सदस्य संदीप गावडे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱयांचे लक्ष वेधून वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. तसेच ग्रामस्थ व वायरमन प्रमोद हनपाडे यांच्या सहाय्याने रस्त्यावरील झाड दूर केले. वीज तारा ओढण्याचे काम सायंकाळी उशिरा पूर्ण करण्यात आले.