|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दहा महिन्यांनी प्रशासकीय लढय़ाला यश

दहा महिन्यांनी प्रशासकीय लढय़ाला यश 

निवडणुकीतील अनामत रक्कम जप्तप्रकरण : तळाशिलमधील नरेंद्र मेस्त यांचा यशस्वी लढा

प्रतिनिधी / मालवण:

ऑक्टोबर 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तोंडवळी-तळाशिलमधील उमेदवार नरेंद्र मेस्त यांची 500 रुपयांची अनामत रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी यू. डी. दीक्षित यांना जप्त केली होती. या निर्णयाविरोधात मेस्त यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. माहिती अधिकारातही मेस्त यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली होती. मेस्त यांच्या लढय़ाला दहा महिन्यानंतर यश आले असून तहसीलदार यांनी ही रक्कम अनावधानाने जप्त झालेली असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी मेस्त यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने अनामत रक्कम जप्त केलेली असून त्यांच्यावर कारवाई होण्याची मागणी केली आहे. माझी अनामत रक्कम जप्त झाल्याबाबत मला लेखी कळविण्यात आले होते तसेच वृत्तपत्रांतूनही याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे माझी बदनामी झाली असून निवडणूक कार्यक्रमासाठी मार्गदर्शन झालेले असतानाही उमेदवाराला नाहक मनस्ताप देण्याचा प्रकार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे घडला आहे. याबाबत वारंवार त्यांना कल्पना देऊनही त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने आपण याप्रकरणी कोकण आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे मेस्त यांनी स्पष्ट केले आहे.

नरेंद्र मेस्त यांनी तोंडवळी-तळाशिल ग्रामपंचायतीसाठी प्रभाग दोनमधून निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी अनामत रक्कम जप्त होण्याच्या संख्येपेक्षा जास्त मते मिळाली होती. असे असतानाही त्यांची अनामत रक्कम जप्त झाल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दिले होते. याबाबत मेस्त यांनी तक्रार केल्यानंतर तहसीलदार यांनी चौकशी केली असता, गणना करताना अनावधानाने एकच उमेदवार विचारात घेतला गेल्याने अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तहसीलदारांनी पत्र पाठवून अनामत रक्कम परत घेऊन जाण्याची सूचना मेस्त यांनी केली. यात तहसीलदार यांनी जप्त केलेली अनामत रक्कम शासन जमा करण्यात आलेली नसल्याने ती परत नेण्यात यावी, असे सांगितले.