|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वाहन अपघातातील हक्कदारांना जलद भरपाई

वाहन अपघातातील हक्कदारांना जलद भरपाई 

मोटार अपघात दावा न्यायाधीकरण कार्यपद्धतीत सुधारणा

प्रतिनिधी / ओरोस:

 मोटार अपघात दावा न्यायाधीकरण कार्यपद्धतीत सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा केली आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना व मयताच्या वारसांना तातडीने नुकसान भरपाई मिळणे शक्य होणार आहे. मात्र यासाठी पोलिसांनी मुदतीत प्रस्ताव दाखल करावा. तसेच विमा कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले.

जिल्हा विधीसेवा प्राधीकरणतर्फे सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सुधारित मोटार अपघात दावा न्यायाधीकरण कार्यपद्धतीबाबत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात पोलीस अधिकाऱयांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हा न्यायाधीश 1 प्रकाश कदम, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती वर्षाराणी पत्रावळे, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सचिव अतुल उबाळे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, ऍड. डी. ए. अंधारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे, विमा कंपनीचे अधिकारी घोलपकर आदी उपस्थित होते.

 ऍड. डी. ए. अंधारी यांनी सुधारित अपघात दावा न्यायाधीकरण कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. मोटार अपघात प्रकरणात पोलिसांनी योग्य पंचनामा, चालक, जखमी, मयत व्यक्तीची माहिती आणि वाहनांची कागदपत्रे जमा करून न्यायालयाकडे सादर होणाऱया अहवालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांनी वाहन चालविण्याचा परवाना असल्याशिवाय ते चालविणे बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर वाहनाचा विमाही आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पोलीस खात्याकडून परिपूर्ण सविस्तर अहवाल दाखल करण्यात येतील व हक्कदार व्यक्तींना लवकरात-लवकर नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन न्यायालय व्यवस्थापक प्रशांत मालकर यांनी केले.