|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘एसएससी मित्र’मुळे गुणवत्ता वाढेल!

‘एसएससी मित्र’मुळे गुणवत्ता वाढेल! 

अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांना विश्वास : सावंतवाडीत प्रकाशन सोहळा

प्रतिनिधी / सावंतवाडी:

‘तरुण भारत’ने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी मानून ‘एसएससी मित्र’ मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. ही पुस्तिका विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मार्गदर्शक आणि प्रबोधन करणारी ठरेल. तसेच त्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत करेल, असा आशावाद गृह तथा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शुक्रवारी ‘तरुण भारत’च्या ‘एससीसी मित्र’ मार्गदर्शक पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. येथील ‘रामेश्वर प्लाझा’मधील ‘तरुण भारत’च्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

‘तरुण भारत’ने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी मानून काम केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीतून पुस्तिका उपलब्ध करून दिली. ‘तरुण भारत’च्या सामाजिक बांधिलकीचा मला सार्थ अभिमान असल्याचे केसरकर म्हणाले.

‘तरुण भारत’ बेळगावमधून सुरू झाला. सीमाभागातील चळवळीसाठी बाबुराव ठाकुर यांनी ‘तरुण भारत’ सुरू केला. सीमाभागाचे ते मुखपत्र आहे. ‘तरुण भारत’ची समाजाच्या प्रत्येक अंगाशी बांधिलकी आहे. बाबुराव ठाकुर यांच्या पश्चात त्यांचे पुत्र किरण ठाकुर यांनी ‘तरुण भारत’ची जबाबदारी स्वीकारली. पूर्वी सर्व वृत्तपत्रे टॅबलाईड स्वरुपाची होती. मात्र, ठाकुर यांनी आधुनिक छपाई तंत्राचा वापर करून मोठय़ा आकाराचे वृत्तपत्र जिल्हय़ात प्रथम सुरू केले, असेही केसरकर यांनी नमूद केले.

सामाजिक बांधिलकीतून काम!

‘एसएससी मित्र’ मार्गदर्शक पुस्तिका सामाजिक बांधिलकी मानूनच ‘तरुण भारत’ने सुरू केली आहे. पुस्तिकेच्या माध्यमातून जिल्हय़ाच्या गुणवत्ता वाढीस मदत मिळेल. किरण ठाकुर यांनी सिंधुदुर्गात शैक्षणिक क्षेत्रात पर्दापण केले आहे. जिल्हय़ात विविध शैक्षणिक अभ्यासक्रम त्यांनी सुरू केले आहेत. त्याशिवाय करिअर गाईडन्ससारखे उपक्रम हाती घेतले आहेत. ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे केसरकर यांनी सांगितले. बेळगावात सुरू झालेला ‘तरुण भारत’ आता महाराष्ट्रात अनेक भागात रुजला आहे. यामागे सामाजिक बांधिलकी असल्याचेही ते म्हणाले.

वेंगुर्ल्यात सागरी संशोधन केंद्र

जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना दहावी, बारावीनंतर स्पर्धा परीक्षा तसेच तर परीक्षात यश मिळावे, यासाठी येत्या दोन महिन्यात सावंतवाडीत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. हे केंद्र आधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक तालुक्याशी जोडले जाईल. मुंबई विद्यापीठाच्यावतीने एन. आय. ओ. च्या धर्तीवर वेंगुर्ल्यात सागरी संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

यावेळी ‘तरुण भारत’चे जिल्हा वितरण प्रतिनिधी सचिन मांजरेकर, जाहिरात प्रतिनिधी श्याम पंडित, डेस्क इन्चार्ज अवधूत पोईपकर, तालुका प्रतिनिधी विजय देसाई, जाहिरात प्रतिनिधी रुजाय रॉड्रीग्ज, उपसंपादक राजेश मोंडकर, अर्जुन राणे, समीर गोसावी, ऍडमिनिस्ट्रेशनचे संतोष खानोलकर, वामन सावंत, सुखाजी लिंगवत, संतोष सावंत, अशोक बोलके, गणपत राऊत, शुभम नाईक तसेच तरुण भारत परिवारातील कर्मचारी तसेच प्रकाश परब, कळसुलकरचे शिक्षक एस. व्ही. भुरे व विद्यार्थी उपस्थित होते.