|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बदलत्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज!

बदलत्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज! 

कुडाळदेशस्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा कुडाळला गौरव

वार्ताहर / कुडाळ:

 कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग आणि कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धी समाज या संस्था ज्ञातीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करीत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून शैक्षणिकदृष्टय़ा समृद्ध करण्याचे काम करीत आहेत. या संस्थांची ही प्रेरणा निश्चितच दिशादायक व फलदायक होईल, असा विश्वास परुळे येथील डॉ. उमाकांत सामंत यांनी रविवारी येथे व्यक्त केला. बदलत्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे सांगून भविष्यात स्वकर्तृत्वावर पुढे जा, असे आवाहन त्यांनी केले.

 कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग (डोंबिवली) आणि कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मण विद्यावृद्धी समाज यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त आज येथील मराठा समाज सभागृहात विद्यार्थी आणि युवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. सामंत बोलत होते.

 आयडियल एज्युकेशन प्रा. लि. (मुंबई) चे व्यवस्थापकीय संचालक जगदिश वालावलकर, कुडाळ हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक का. आ. सामंत, जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, विद्यावृद्धीचे कार्यवाह महादेव सामंत, उपाध्यक्ष कमलाकर देसाई, सहयोगचे उपाध्यक्ष शामसुंदर सामंत, शिरगाव हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक शमसुद्दीन आत्तार, सहयोगचे कार्याध्यक्ष गणेश देसाई, विद्यावृद्धीचे किरण सामंत, भिकाजी वालावलकर आदी उपस्थित होते.

 डॉ. सामंत म्हणाले, सहयोग व विद्यावृद्धी समाज या संस्था ज्ञातीसाठी कार्यरत असून त्यासाठी दानशूर व्यक्तींचे योगदान आहे. या संस्थांचे कार्यकर्ते सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून भावी पिढीच्या उन्नतीसाठी समर्थपणे काम करीत आहेत. ज्ञातीतील बुद्धिवान तसेच उच्चपदस्थ व्यक्तींनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ज्ञातीतील युवकांना देण्यासाठी प्रयत्न करावेत. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण ही आज स्पर्धेच्या युगातील काळाची गरज आहे, असे सांगून बदलत्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचीही मानसिकता बदलली पाहिजे. पालक व शिक्षकांनी त्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्याला क्षेत्र निवडण्यासाठी संधी दिली पाहिजे, असे सांगितले. कुडाळदेशस्थ गौड ब्राह्मणचे त्रैमासिक हा ज्ञातीचा आरसा आहे. त्यात संस्थेच्या कार्याची माहिती मिळते. आर्थिक सहाय्यावर या संस्था सुरू असतात, त्या सक्षमपणे सुरू राहण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे.

 वालावलकर म्हणाले, आपला सामाजिकस्तर उंचवायचा असेल, तर तरुणांनी उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे. ज्ञातीतील गरजू, गुणवंत विद्यार्थी भविष्यात कर्तृत्ववान व्हावेत, यासाठी संस्था कार्यरत आहेत. समाजाच्या वृद्धीसाठी संस्था बळकट झाल्या पाहिजेत. शिष्यवृत्तीची भविष्यात परतफेड करा. त्याचा उपयोग अन्य गरजूंना करता येईल.

 का. आ. सामंत म्हणाले, अभ्यासाबरोबर वाचन महत्वाचे आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान आत्मसात करून ज्ञान वाढविले पाहिजे. विद्यार्थ्याने ध्येय डोळय़ासमोर ठेवून वाटचाल करावी. देसाई म्हणाले, ज्ञातीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा व स्फूर्ती देणारा हा गुणगौरव कार्यक्रम स्तुत्य आहे. विविध उपक्रमांतून या संस्थांनी सुरू केलेली ही सामाजिक चळवळ ज्ञातीला प्रगतीकडे नेईल, असे सांगून कुडाळ येथे कुडाळदेशकर यांचे भवन उभारण्यासाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. येत्या तीन-चार वर्षांत ‘पूर्णानंद भवन’ सर्वांच्या सहकार्याने उभे राहील, असे सांगितले.

 कमलाकर देसाई व महादेव सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले. किरण सामंत यांनी शिष्यवृत्तीबाबत माहिती दिली. प्रास्ताविक गणेश देसाई यांनी केले. तत्पूर्वी प्रा. आत्तार यांनी विद्यार्थी व युवक-युवतींना ‘शिक्षण आणि तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल का. आ. सामंत व प्रा. आत्तार यांचा सपत्नीक विशेष गौरव करण्यात आला. मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. दहावी, बारावी, पदव्युत्तर व व्यावसायिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

 रत्नाकर तेंडोलकर, महेश राळकर, अरुण तेंडोलकर, चंद्रकांत ठाकुर, शिल्पा सामंत, संजय सामंत-नेवाळकर, सुरेंद्रनाथ ठाकुर, एस. व्ही. देसाई, संजीवनी देसाई, संजय ठाकुर, वल्लभ सामंत, पत्रकार शेखर सामंत, डॉ. प्रशांत सामंत, प्रभाकर नाईक, भाऊ नाईक, प्रदीप नेरुरकर, केदार सामंत, डी. ए. सामंत, स्नेहल सामंत, नीलेश सामंत, रवींद्र प्रभू, संतोष पाटील, श्रीकृष्ण प्रभू-केळुसकर तसेच ज्ञातीतील बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.