|Sunday, December 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गात एटीएम फोडून कॅश पळविण्याचा प्रयत्न

दोडामार्गात एटीएम फोडून कॅश पळविण्याचा प्रयत्न 

वार्ताहर / दोडामार्ग:

दोडामार्ग शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेलगतचे एटीएम फोडून आतील कॅश पळविण्याचा प्रयत्न झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. एटीएम फोडताना चोरटय़ांनी दगडाचा वापर केला. मात्र, सदर एटीएमच्या मशिनचे लॉक उघडता न आल्याने चोरटय़ांनी आपली अवजारे तेथेच टाकून पोबारा केला.

शहरातील तिलारी रोडवर गांधी चौकापासून हाकेच्या अंतरावर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेला लागूनच बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. बँक व एटीएमसमोर अनेक दुकाने आहेत. दिवसा या ठिकाणी बरीच वर्दळ असते. मात्र, चोरटय़ांनी बहुधा पावसाळा व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे एटीएम मशिन फोडत आतील कॅश पळविण्याचा प्रयत्न केला. चोरटय़ांनी यासाठी काळय़ा जांभा दगडाचा वापर केला. तसेच या एटीएमचे मुख्य दार चोरटय़ांनी फोडून उघडले. मात्र, आतील मुख्य दाराचे लॉक तोडता न आल्याने चोरटय़ांनी तेथून काढता पाय घेतला. एवढेच नव्हे तर एटीएम मशिनच्या आतमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा चोरटय़ांनी प्रयत्न केला. या प्रकाराची अर्जुन गोविंद रगजी (आरवली-वेंगुर्ले) यांनी बँक ऑफ इंडियाचे दोडामार्ग शाखाधिकारी रविरमण यांना कल्पना दिली. त्यांनी या प्रकाराची माहिती रत्नागिरी येथील आपल्या विभागीय कार्यालयाला कळविली. दोडामार्ग शहरात बँक ऑफ इंडियासह अन्य बँकांची एटीएम मशिन असून काही ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत. तर काही ठिकाणी नाहीत. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव करत आहेत.

Related posts: