|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताकडे आजवरचा सर्वात संतुलित जलद मारा

भारताकडे आजवरचा सर्वात संतुलित जलद मारा 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आजवरच्या परिपूर्ण व संतुलित वेगवान गोलंदाजीचे आक्रमण घेऊन भारतीय संघ इंग्लंडच्या कठीण दौऱयावर जात आहे. आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत अशी वैविध्यपूर्ण जलद गोलंदाजी कधीच पहायला मिळाली नव्हती, असे मत माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

इंग्लंडच्या तीन महिन्यांच्या कठीण दौऱयाला आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांनी 27 जूनला सुरुवात होणार आहे. मात्र सर्वांचे लक्ष असेल ते 1 ऑगस्टपासून बर्मिंगहॅममध्ये सुरू होणाऱया कसोटी मालिकेवर. ‘कित्येक वर्षांनंतर भारताला परिपूर्ण वेगवान गोलंदाजांची फळी मिळाली असून ती उत्कृष्ट आक्रमणांपैकी एक असल्याचे मला वाटते,’ असेही सचिन म्हणाला. 24 वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या संघात अनेक दर्जेदार वेगवान गोलंदाज होते. पण त्यात इतकी विविधता नव्हती. आता आपल्याकडे स्विंग करणारा भुवनेश्वर आहे, उंची असलेला इशांत शर्मा, अचूक मारा करणारा जसप्रित बुमराह आणि वेग असलेला उमेश यादव आहे. वैविध्याचे उत्तम संतुलन असलेला हा मारा आहे, असेही तो म्हणाला.

सचिनने भुवनेश्वरचे विशेष कौतुक केले. आपल्या अष्टपैलू क्षमतेच्या बळावर तो कोणत्याही क्षणी पारडे भारताच्या बाजूने झुकवू शकतो. अलीकडे फलंदाजीत योगदान देऊ शकणारा सीम गोलंदाज निवडण्यावर भर दिला जात आहे. भुवनेश्वर व हार्दिक पंडय़ा यांच्याकडे ही योग्यता असून दोघांनी ते काही वेळा सिद्धही करून दाखविले आहे. कसोटी मालिका ऑगस्टमध्ये सुरू होत असल्याने भारतासाठी ते लाभदायक ठरू शकतो. कारण तोपर्यंत तेथील वातावरणाची संघाला सवय झालेली असेल. त्यामुळे भारताची कामगिरी सरस होऊ शकते, असेही तो म्हणाला.