|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » कंपन्यांना जाणवतेय बुद्धिमानांची कमतरता

कंपन्यांना जाणवतेय बुद्धिमानांची कमतरता 

पहिल्या दहा देशांत भारताचाही समावेश  जागतिक पातळीवर कौशल्य, अनुभवाचा अभाव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक कंपन्यांमध्ये प्रतिभावंत कर्मचाऱयांचा तुटवडा भासत आहे. गेल्या 12 वर्षातील ही सर्वात मोठी कमतरता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या 10 बाजारपेठांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारतातील 56 टक्के कंपन्यांनी रिक्त जागा भरण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.

मॅनपॉवरग्रुप या कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘टॅलेन्ट शॉर्टेज सर्वे’मध्ये जगभरातील 40 हजार कंपन्यांना सहभागी करण्यात आले. यापैकी 45 टक्के कंपन्यांनी जागा भरण्यासाठी योग्य कर्मचारी निवडताना समस्या येत आहे, असे म्हटले. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कौशल्याचा अभाव दिसून येत आहे. योग्य पदासाठी कर्मचाऱयांची निवड करणे हे आव्हान आहे. त्यामुळे कौशल्य सुधारणे आवश्यक आहे, असे मॅनपॉवरग्रुपचे प्रमुख व सीईओ जोनास प्रायसिंग यांनी सांगितले.

सध्या कंपन्यांमध्ये असणाऱया कर्मचाऱयांना प्रशिक्षण देणे आणि गुणवत्ता सुधारणे आवश्यक आहे. दीर्घ काळासाठी कर्मचाऱयांतील गुणवत्ता प्रगत होणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक गुणवत्तेचा फटका बसणाऱया देशांत अव्वल स्थानी जपान असून तेथे 89 टक्के तुटवडा भासत आहे. यानंतर रोमानिया 81 टक्के आणि तैवान 78 यांचा क्रमांक लागतो.

सध्या कंपन्या डिजिटल आणि सुधारणावादी होण्यावर भर देत आहेत. तांत्रिक कौशल्य आणि संवाद, सहकार्य आणि समस्या सोडवणूक यासारखे महत्त्वाचे प्रश्न सोडविणाऱया कर्मचाऱयांची कमतरता भासत आहे. अनेक कर्मचाऱयांमध्ये अनुभव, कष्ट करण्याचा अभाव दिसून येत आहे.

चीनमध्ये योग्य कौशल्य असणाऱया कर्मचाऱयाची निवड करताना सर्वात कमी समस्या येत असून त्या 13 टक्के आहेत. यानंतर आयर्लंड 18 टक्के, ब्रिटन 19 टक्के, नेदरर्लंड्स 24 टक्के आणि स्पेन 24 टक्के यांचा क्रमांक लागतो.