|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वटपौर्णिमा पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी

वटपौर्णिमा पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी 

बेळगाव / प्रतिनिधी

वटपौर्णिमेच्या निमित्ताने शहर परिसरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. पूजा साहित्यासह फळफळावळे आणि इतर सामग्री खरेदी करण्याकरिता भर पावसातदेखील ग्राहकवर्गाचा उत्साह ओसंडून वाहत होता.

बुधवारी वटपौर्णिमेचा दिवस असल्याने सुवासिनींकडून शहरात ठिकठिकाणी वटवृक्षांचे पूजन होणार आहे. यानिमित्ताने पूर्व तयारीला वेग आल्याचे दिसून आले. पूजनासाठी लागणारे आवश्यक साहित्य असणारे द्रोण तसेच इतर सामग्रीचे संच विकणाऱया मंडळींचे ठाण बाजारात दिसून आले.

मंगळवारी दिवसभर पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. पाऊसधारांच्या वर्षावात छत्री, रेनकोटच्या सोबतीने बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी होती. मंगळवार हा बाजाराच्या सुटीचा दिवस असूनही पूजा साहित्य खरेदीकरिता मोठय़ा संख्येने ग्राहकवर्ग बाजारपेठेत दाखल झाला होता. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती.

वटपौर्णिमेच्या पूजा साहित्याचा संच 30 रुपये, आंबे 50 रुपये डझन, फणसाचे गरे दहा रुपयांना पाच, जांभळांचे माप वीस रुपये याप्रमाणे विक्री सुरू होती. ग्राहकांची गरज ओळखून विपेत्यांनी याची पर्वणी साधली.