|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मिठबाव गजबादेवी येथील डोंगराला समुद्राच्या धडका

मिठबाव गजबादेवी येथील डोंगराला समुद्राच्या धडका 

वार्ताहर / देवगड:

मिठबाव गजबादेवी मंदिर किनारी परिसरात समुद्राच्या अतिक्रमणामुळे तेथील डोंगर खचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मंदिर परिसराला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बहुतांश शेतकऱयांच्या जमिनीला धोका पोहोचला असून जमिनीच्या क्षेत्रातील भूभाग समुद्रात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या आठवडय़ात कोकण किनारपट्टी भागात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये अनेक रस्त्यांचे नुकसान झाले. यात समुद किनारी भागातील डोंगर खचण्याचे प्रकारही झाल्याचे दिसून आले. मिठबाव गजबादेवी परिसर पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचा असून तेथील समुद्र किनारी भागातील डोंगर खचण्याचा प्रकार सुरू झाला आहे. समुद्राच्या उधाणाचा फटका किनारी भागात जोरदार बसत असल्यामुळे वेगाने येणाऱया लाटांमुळे माती वाहून जाणे व डोंगराचे मोठ-मोठे दगड कोसळू लागले आहेत. समुद्र किनारी भागात येथील प्रसिद्ध श्री देवी गजबादेवीचे मंदिर असून भाविक व पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. मंदिराच्या लगत समुद्राचे पाणी येत असून देवालय परिसरालाही याचा धोका निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. तेथील तटबंदीलाही लाटांच्या माऱयामुळे तडे गेल्याचे दिसून आले आहे. लगतच्या शेतकऱयांच्या बहुतांशी जमिनी या भागात असून तेथील मातीची धूप होऊ लागली आहे. समुद्रच डोंगराच्या लगत येऊ लागल्याने कालांतराने हा भागही समुद्र गिळंकृत करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.