|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिशाभूल

महामार्गाच्या कामाबाबत ढवळीकरांकडून जनतेची दिशाभूल 

त्यावेळी आपण मुख्यमंत्री नव्हतोच : आमदार रवी नाईक यांचा खुलासा

प्रतिनिधी/. फोंडा

खांडेपार येथे गोवा-बेळगाव महामार्गावर दरडी कोसळण्याची घटना ही नैसर्गिक नसून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदारपणामुळेच ओढवलेली आपत्ती आहे. या निष्काळजीपणाचा फटका हजारो प्रवाशांना बसलेला आहे. प्रवाशांच्या गैरसोय दूर करण्यापेक्षा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर या कृत्याचे खापर इतरांच्या डोकी फोडू पाहत आहे, असा आरोप फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केला आहे.

सन् 1991 मध्ये आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महामार्गासाठी भूसंपादन केल्याचा सुदिन ढवळीकर यांचा दावा साफ खोटा असल्याचे रवी नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. प्रत्यक्षात आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली होती. शिवाय महामार्गाचा विस्तार 60 मीटर करण्यास भाजपासह इतरांनी विरोध केला होता. त्यामुळे या घटनेची जबाबदारी टाळून मंत्री ढवळीकर जनतेची दिशाभूल करीत आहेत. खांडेपार येथे चुकीच्या पद्धतीने डोंगरकडा कापण्यामागे त्यांचा छुपा हेतू आहे. महामार्गाच्या विस्तारासाठी भराव टाकून रस्ता समांतर पातळीवर आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मातीची आवश्यकता आहे. ही माती मिळविण्यासाठी व त्याठिकाणी काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याच्या उद्देशाने मुद्दामहून हे कृत्य केल्याचा आरोपही रवी नाईक यांनी केला. डोंगर कापणीसाठी व माती उपसण्यासाठी वेगवेगळय़ा निविदा काढून त्यावर कमीशन मारण्याचाही त्यांचा डाव असल्याचे रवी नाईक म्हणाले.

फोंडा तालुका व राज्याच्या इतर भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. उन्हाळय़ात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची पहिल्या पावसात वाताहात होते. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा लक्षात येतो. गेली अनेक वर्षे बांधकामखाते सुदिन ढवळीकरांकडे आहे. या खराब रस्त्याबद्दल गोमंतकीय जनतेला त्यांना उत्तर द्यावे लागेल, असेही रवी नाईक पुढे म्हणाले.