|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘इलेक्टिव्ह मेरीट’ला काँग्रेसचे प्राधान्य

‘इलेक्टिव्ह मेरीट’ला काँग्रेसचे प्राधान्य 

प्रतिनिधी/सांगली

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गेल्या दोन दिवसात प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण, ‘इलेक्टिव्ह मेरीट’चा अवलंब करीत उमेदवारी देण्यात येणार असून प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस सांगली, मिरजेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यानंतर हर्षवर्धन पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, पक्षनिरीक्षक अभय छाजेड, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, महापालिकेच्या 78 जागासाठी निवडणूक होत असली तरी पक्षाकडे तब्बल 325 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी गेल्या दोन दिवसात मुलाखती दिल्या आहेत. पक्षाकडे अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. एका एका जागेवर तीनपेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत. निवडून येण्याची क्षमता असणाऱयांनाच म्हणजे इलेक्टिव्ह मेरीटला प्राधान्य देऊन उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा मनपावर काँग्रेसचीच सत्ता अबाधित राहणार आहे. चार जुलै रोजी मुंबईत प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे. आणि प्रदेश काँग्रेसकडूनच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीशी आघाडीबाबत वाटाघाटी सुरू आहेत. पण, अद्याप आघाडीचा कोणाताच निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवर आघाडीबाबत चर्चा होऊन आघाडीचा निर्णय आता प्रदेश काँग्रेसकडे गेला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच या बाबत निर्णय घेणार आहे. सद्य स्थितीला आम्ही सर्वच्या सर्व 78 जागेवर निवडणुका लढविण्याची तयारी केली असल्याचेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे. पण, गेल्या चार वर्षात देशभरात 21 लोकसभा मतदार संघात निवडणुका झाल्या आहेत. यापैकी केवळ तीन जागाच भाजपाला मिळाल्या आहेत. त्यामुळे पेंद्रातील आणि राज्यातील या सरकारबाबत जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीत काँग्रेसला होणार आहे. या निवडणुकीत भाजपा ज्या अपेक्षावर बसले आहे, त्यांची ती अपेक्षा फोल ठरणार असून पक्षातून आयाराम गयारामांना जनता कधीच थारा देत नसल्याचा उल्लेखही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला.