|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बिल्डरचे कार्यालय फोडून सहा लाख लंपास

बिल्डरचे कार्यालय फोडून सहा लाख लंपास 

कोल्हापूर नाक्यावरील घटना, लगतच्या बँकेतही चोरीचा प्रयत्न

वार्ताहर/ कराड

येथील कोल्हापूर नाक्यावरील महामार्गावर पंजाब हॉटेलनजीक असलेल्या बिल्डरचे कार्यालय फोडून अज्ञात चोरटय़ांनी सुमारे सहा लाख रूपयांची रोकड लंपास केली. तर नजीकच असलेल्या एका बँकेतही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत बिल्डर दत्तात्रय हणमंत देसाई यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय देसाई यांच्या डी. एस. देसाई असोसिएट कन्ट्रक्शनचे कार्यालय कोल्हापूर नाक्यावर आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी कामगारांचे पगार व व बिल्डींग साहित्याचे पैसे भागवण्यासाठी देसाई यांनी 5 लाख 90 हजार रूपयांची रक्कम कार्यालयात ठेवली होती. त्यांच्या कॅशियरने ही रक्कम कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवून सात वाजता ते घरी गेले होते. तशी माहितीही देसाई यांना दिली होती. यानंतर देसाई हे नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजता कार्यालय बंद करून ते घरी गेले.

  रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कामगार कार्यालय उघडण्यासाठी आले असता शटरचे कुलूप उचकटल्याचे दिसले. संशय आल्याने त्यांनी शटर उघडून पाहिले असता आतील लाकडी दरवाजाचेही कुलूप उचकटल्याचे दिसले. आतील ड्रॉवरमधील 5 लाख 90 हजार रूपयांची रोकड गेल्याचेही निदर्शनास आले. या कार्यालयानजीकच असणाऱया इंडसइंड मार्केटींग फायनान्स सर्व्हिसेस प्रा. लि. बँकतही चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. बँकेचेही कुलूप उचकटून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. सर्व साहित्य उचकटले मात्र चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही.

    नेहमी वर्दळ असणाऱया महामार्गालगत चोरीची घटना घडल्याने मलकापूर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे, पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान बिल्डींग परिसरातच घुटमळले. यावेळी ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.