|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » किरकोळ अपघातानंतर दोन गटात राडा

किरकोळ अपघातानंतर दोन गटात राडा 

किल्ला तलावाजवळ हाणामारी, पाच जखमी

प्रतिनिधी/ बेळगाव

रविवारी दुपारी आरटीओ सर्कलजवळ वऱहाडी टेम्पोने दुचाकीला ठोकरल्याने झालेल्या किरकोळ अपघातानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दगडफेक व हाणामारीत पाचजण जखमी झाले असून वऱहाडी टेम्पोवरही दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या आहेत. किल्ला तलावाजवळील अशोक स्तंभाजवळ घडलेल्या या घटनेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

रविवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरटीओ सर्कलजवळ झालेल्या किरकोळ अपघाताचे पडसाद अशोक स्तंभाजवळ उमटले. हाणामारी व दगडफेकीनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव निवळला. परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त व उपायुक्तांसह अनेक वरि÷ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

टेम्पोचालक बसय्या सिद्धलिंगय्या हिरेमठ (वय 26), बसवराज द्यामप्पा तळवार (वय 23, दोघेही रा. पट्टीहाळ के. बी., ता. बैलहोंगल), उमर अब्दुलसत्तार बडेभाई (वय 20, रा. कोतवाल गल्ली), उजेर खालीद मनियार (वय 17, रा. उज्ज्वलनगर), अब्दुलमतीन महम्मदगौस शेख (वय 20, रा. दरबार गल्ली) अशी जखमींची नावे असून सर्व जखमींवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. दोघा जणांवर दगडाने तर तिघा जणांवर ब्लेडने हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.

घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, गुन्हे तपास विभागाचे उपायुक्त महानिंग नंदगावी, मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, मार्केटचे पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, रहदारी उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील आदींसह शहरातील बहुतेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पोलीस उपायुक्त व इतर अधिकाऱयांनी जखमींकडून माहिती घेतली.

अशोक स्तंभ परिसरात वाहतूक कोंडी

या घटनेनंतर अशोक स्तंभ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी प्रथम वाहतूक सुरळीत केली. त्याचवेळी जखमी तरुणांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या परिसरात जखमींचे नातेवाईक व मित्र परिवाराने गर्दी केली. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटल परिसरातही तणावाची स्थिती होती. पोलीस अधिकाऱयांनी गर्दी पांगवून उपचारानंतर पाचही तरुणांना पोलीस स्थानकात नेले.

या संबंधी घटनास्थळावरून व पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बैलहोंगल तालुक्मयातील पट्टीहाळ के.बी. येथून 10 प्रवासी टेम्पोतून लग्नासाठी वऱहाडी बेळगावला आले होते. पोलीस हेडक्वॉर्टर्समधील वीरभद्र कल्याण मंडपात लग्न होते. लग्न समारंभ व जेवण आटोपून दुपारी 4 वाजता 4 टेम्पोतून वऱहाडी गावी परतले. केए 24/544 क्रमांकाच्या प्रवासी टेम्पोतून सुमारे 25 वऱहाडींना घेऊन चालक पट्टीहाळ के.बी.कडे जात होता.

वऱहाडी टेम्पो आरटीओ सर्कलजवळ येताच टेम्पो चालक बसय्या हिरेमठ याने आपला टेम्पो डाव्या बाजूने वळविला. त्याचवेळी या मार्गावरून जाणाऱया एका दुचाकीला टेम्पोची धडक बसली. या किरकोळ अपघातानंतर टेम्पोचालक तेथे थांबला नाही. रहदारी पोलिसांनी तातडीने किल्ला तलावाजवळील अशोक स्तंभ परिसरात सेवेत असलेल्या पोलिसांना माहिती देऊन टेम्पो अडविला. अशोक स्तंभ परिसरात टेम्पो अडविल्याचे समजताच आरटीओ सर्कलजवळ जमलेल्या गर्दीतील काही जण अशोक स्तंभ परिसरात पोहोचले. तेथे वादावादी होऊन दोन गटात राडा झाला.

संवेदनशील भागात गस्त वाढविली

टेम्पो चालकाला मारहाण करण्यात आली. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. दगडफेकीत बसवराज हा तरुण जखमी झाला आहे. उर्वरित तीन तरुणांनाही मारहाण करण्यात आली असून दोघा जणांवर ब्लेडने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संवेदनशील भागात गस्त वाढविली. टेम्पो तातडीने दुसरीकडे हलविण्यात आला. किरकोळ अपघातानंतर झालेल्या हाणामारीचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांची गस्त वाढविण्यात आली.

अपघात, हाणामारी प्रकरणी गुन्हे दाखल

आरटीओ सर्कलजवळ वऱहाडी टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या किरकोळ अपघातासंबंधी रात्री रहदारी उत्तर विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशोक स्तंभाजवळ झालेल्या हाणामारी प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

हाणामारी सीसीटीव्हीत कैद

अशोक स्तंभ परिसरात झालेल्या हाणामारीची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. कोणी दगडफेक केली, कोणी कोणाला मारहाण केली याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी फुटेजवरून मिळविली असून फुटेजमध्ये दिसणाऱया चेहऱयांसाठी शोध घेण्यात येत आहे. किरकोळ अपघातानंतर राडा का झाला? टेम्पोमधील वऱहाडींनी कोणत्या घोषणा दिल्या, याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.