|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तो सकर्मुचि कर्मरहितु

तो सकर्मुचि कर्मरहितु 

ज्ञानेश्वर माउलींनी वर्णन केलेली विश्वरूप अवस्था खरोखरच कुणाला अनुभवायला येते काय हो? प्रसिद्ध तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्तींच्या आयुष्यातला एक अनुभव त्यांनी लिहून ठेवला आहे. ते लिहितात-विश्वाशी एकरूप होण्याचा अभ्यास करीत असताना मी गवताच्या पात्याशी एकरूप झालो. त्या पात्यातून वर चढणारा रस मला माझ्या ठिकाणी स्पष्ट जाणवू लागला. सूर्यप्रकाशाचा स्पर्श मला कळू लागला. मग मी खाली नजर टाकली. एक मोटार घाट चढून येत होती. मी तिच्याशी एकरूप झालो. इतका की गाडीच्या टायरवर येणारा दाब मला जाणवू लागला.

त्या सिद्ध पुरुषाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात-

हा मत्सरु जेथ उपजे ।

तेतुलें नुरेचि जया दुजें ।

तो निर्मत्सरु का‌इ म्हणिजे । बोलवरी ?

मनाचे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर इत्यादि जे विकार आहेत, ते द्वैत बुद्धीचा परिपाक आहेत. द्वैतबुद्धीमुळेच मीतूपण निर्माण होते. माझं तुझं निर्माण होतं. त्याचा सहज परिणाम हव्यासात आणि संग्रहवृत्तीत होतो. त्यामुळेच क्रोधाची आणि मत्सराची वाढ होते. म्हणून ज्ञानेश्वर माउली म्हणतात की मत्सर उत्पन्न होण्यासाठी लागणारं दुजेपणच त्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी नसतं. त्यामुळं अशा सिद्ध पुरुषाच्या ठायी मत्सर नसतो. तो निर्मत्सर असतो. हे बोलून सांगायला पाहिजे काय? पाऊस पडलाच नाही तर धान्य कसं होणार? उद्योग केलाच नाही तर वैभव कसं प्राप्त होणार? तसंच, द्वैतच जिथं नाही तिथं मत्सर करायचा कोणाचा? सर्व जर मीच असेन तर मला प्राप्त नाही असं काय असणार?

म्हणौनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु ।

सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ।

अशा प्रकारे सर्व परीनं जो मुक्त असतो तो जरी सर्व कर्मे करीत असला तरी कोणत्याही कर्मबंधनानं तो बांधला जात नाही. तो त्या कर्मामुळं अडकत नाही. त्याच्या ठिकाणी कर्तृत्वभावच नसतो. त्याच्या हातून होणारी कर्मे ही प्रकृतीमुळं होत असतात. तो कर्मरहितच असतो.

एका वेगळय़ा दृष्टिकोनातून आपल्याला हे समजावून घेता येईल. आपल्या देहाकडूनही दोन प्रकारची कार्ये होत असतात. काही कार्ये ऐच्छिक असतात, तर काही अनैच्छिक असतात. अभ्यास करणं, वृत्तपत्र वाचणं, सिनेमा पाहणं, फिरायला जाणं, मोटार चालवणं, चित्र काढणं, नृत्य करणं, बोलणं, खाणं, पिणं इत्यादी कार्ये ऐच्छिक असतात. पण श्वासोच्छ्वास घेणं, तोल सावरणं, डोळय़ांवरील पापण्यांची उघडझाप, घाम येणं, रुधिराभिसरण, खोकला, जांभई, शिंक इत्यादी कामे प्रकृतीच करते. तिथे आपल्या इच्छेचा काही संबंध नसतो. त्यामुळे, मी श्वासोच्छ्वास करीत आहे, असा आपल्या ठिकाणी कर्तृत्वभावही नसतो. साधूंची सर्व कर्मांच्या बाबतीत अशीच स्थिती असते. म्हणून सर्व कर्मे करूनही ते अकर्ता असतात. ते सगुण दिसत असूनही निर्गुण असतात. आत्मबोध झालेला माणूस हा सर्व गुणकर्माच्या अतीत असतो ह्यात मुळीच संशय असण्याचे कारण नाही.

ऍड. देवदत्त परुळेकर