|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तुयेतील आरोग्य केंद्र तज्ञ डॉक्टर, सुविधांच्या प्रतिक्षेत

तुयेतील आरोग्य केंद्र तज्ञ डॉक्टर, सुविधांच्या प्रतिक्षेत 

महादेव गवंडी/ पेडणे

पेडणे तालुक्यातील तुये येथील सामुदाईक आरोग्य केंद्र तज्ञ डॉक्टर व अद्यावत सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. हे इस्पितळ बाहेरुन अगदी चकाचक व स्वच्छ आहे, मात्र डॉक्टर व विविध सुविधांच्या कमतरतेमुळे कोमात गेल्यात जमा आहे.

पेडणे तालुक्याची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात असूनही या इस्पितळाकडे मात्र जनतेने दुर्लक्ष केले आहे. बाहेरुन चकाचक दिसणाऱया या इस्पितळात सुविधांचा आभाव आहे व तज्ञ डॉक्टरांचीही कमतरता आहे. त्यामुळे पेडणे तालुक्यातील रुग्ण अन्य रुग्णालयात जाणे पसंत करतात. इस्पितळात अजूनही कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नाही. आठवडय़ातून केवळ एक दिवस स्त्री रोगतज्ञाची व्हिजीट असते. बालरोग तज्ञही नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते.

मशिनरी आहेत, पण तंत्रज्ञ नाहीत

तंत्रज्ञ नसल्याने मशिनरी पडून

इस्पितळात सोनोग्राफी मशिनरी बसविण्यात आली आहे, मात्र ही मशिनरी चालविणारे तज्ञ मात्र उपलब्ध नाहीत. या इस्पितळाला लॅब टेक्नेशियन देण्यात आला होता मात्र त्याची बदली आता वास्को चिखली येथे करण्यात आली आहे. त्याचा पगार मात्र तुये आरोग्य केंद्रामार्फतच होत आहे. पगार तुयेतून सेवा मात्र चिखलीला असा आंधळा कारभार सुरू आहे. याशिवाय रेडिओलॉजीस्ट डॉक्टर नाही. त्यामुळे पेडणे तालुक्याची आरोग्य सेवा देणारे हे इस्पितळ बाहेरुन चकाचक वाटत असले तरी सुविधांअभावी आतून पोकळच आहे.

काही यंत्रणा इस्पितळात उपलब्ध आहेत मात्र त्या हाताळणारे तज्ञ नसल्याने साध्या साध्या तपासण्या करण्यासाठी इस्पितळात येणाऱया रुग्णांना पदरमोड करत म्हापसा, बांबोळी व अन्य ठिकाणच्या इस्पितळात जावे लागत आहे. अनेकवेळा काही तपासण्या करण्यासाठी रुग्णांना खासगी सेवा नाविलाजाने घ्याव्या लागत आहेत. यात त्यांना बरीच रक्कम खर्च करावी लागत आहे. त्यामुळे बाहेरुन चकाचक दिसणारे हे इस्पितळ बेगडी असल्याची टीका अनेक रुग्ण करत आहेत.

इस्तितळाला नवा साज, पण सुविधांची आबाळ

मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तुये येथील जुन्या सामुदायीक आरोग्य केंद्राला झळाळी दिली होती.  आरोग्य खात्यातर्पे या इस्पितळाची सुधारणा करताना अनेक सुविधा निर्माण केल्या होत्या. इस्पितळाची इमारतही सुसज्य बनविण्यात आली असून यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. आरोग्यमंत्री या नात्याने प्रा. पार्सेकर यांनी इस्पितळाला नवा साज दिला खरा पण आवश्यक प्रमाणात सुविधा व तज्ञ डॉक्टरांचा आभाव या समस्येत हे इस्पितळ अजूनही झगडत आहे.

कायमस्वरूपी आरोग्य अधिकाऱयाची गरज

तुये येथील या आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा परुळेकर यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची बदली पणजी येथील आरोग्य संचालनालयात झाली आहे. सरकारने मार्चनंतर तुये केंद्रात अद्याप वैद्यकीय अधिकारी नेमला नाही. सध्या डॉ. अमिता रेडकर यांच्याकडे आरोग्य अधिकारी म्हणून तात्पुरता ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता रुग्ण तपासणीबरोबरच संपूर्ण इस्पितळाची जबाबदारी तसेच या सामुदायिक केंद्राअंतर्गत येणाऱया अन्य सर्व ग्रामीण उपकेंद्राची जबाबदारीही संभाळावी लागत आहे. तुये इस्पितळात दररोज सुमारे 150 च्यावर रुग्ण येत असल्याने या सर्व रुग्णांच्या तपासणीचा भारही डॉ. अमिता रेडकर यांनाच संभाळावा लागतो. त्यामुळे या आरोग्य केंद्राला कायमस्वरुपी आरोग्य अधिकाऱयांची गरज असून विविध तज्ञ डॉक्टरांची नियुक्तीही करणे गरजेचे आहे.

इस्पितळ परिसरात दुर्गंधी

तुये इस्पितळ परिसरात नवीन इस्पितळ इमारतीचे बांधकाम करण्यासाठी जे मजूर आणले आहेत त्यांच्याकडून इस्पितळ परिसरात कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे इस्पितळात येणाऱया रुग्णांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा परिसर अस्वच्छ असल्याने येथे मोठय़ा प्रमाणात डासांची उत्पत्तीही झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची डबकीही तयार झाली आहेत. जुन्या क्वॉर्ट्सच्या जागेत प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या तसेच कचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येतो. या केंद्रासाठी देखभाल समितीची नियुक्ती करण्यात आली असून या समितीचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. इस्पितळाला पाण्याची व्यवस्था करणारी पाण्याची टाकी फारच जुनी असल्याने झिरपत असून ती बदलण्याची गरज आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनाकडे लक्ष

दोन महिन्यापूर्वी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी तुये येथे होणाऱया नवीन इस्पितळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी बोलाविले होते. तुये येथील जुन्या इस्पितळातील डॉक्टर व कर्मचाऱयांच्या रिक्त जागांविषयी त्यांना कल्पना देण्यात आली होती. त्यानुसार आरोग्यमंत्री राणे यांनी तुये येथे भेट देऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला होता. सुमारे 55 कोटी खर्चून तुयेतील हे इस्पितळ गोव्यातील सर्वसोईंनी युक्त असलेले इस्पितळ बनविणार असे आश्वासन यावेळी मंत्री राणे यांनी दिले होते. दर तीन महिन्यांनी झालेल्या कामाचा अहवाल स्थानिक आमदारांना द्यावा, असा आदेश त्यांनी कंत्राटदार कंपनीला दिला होता. इस्पितळातील रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासनही आरोग्यमंत्र्यांनी दिले होते.

आरोग्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार : आमदार सोपटे

आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन आज दोन महिने उलटले तरी या इस्पितळातील रिक्त जागा भरण्यासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या विविध आश्वासनांचे त्यांना स्मरण करण्यासाठी आपण पुन्हा एकदा लवकरच मंत्री विश्वजित राणे यांची भेट घेणार आहे. विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधी रिक्त जागा भराव्यात यासाठी आपण आरोग्यमंत्र्यांकडे आग्रह करणार आहे. आरोग्यमंत्री आश्वासनाची नक्की पूतर्ता करतील, असे आमदार दयानंद सोपटे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. 

Related posts: