|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अकाळींचीं अभ्रें जैशीं

अकाळींचीं अभ्रें जैशीं 

त्या गुणातीत झालेल्या साधुविषयी ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात –

तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे ।

पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ।

असा आत्मविद् साधु देही असला तरी तो देहाविषयी उदासीन असतो. त्याचं देहतादात्म्य संपलेलं असतं. तो देही दिसला तरी चैतन्याप्रमाणे अलिप्त असतो. चैतन्य देहामधून खेळतं, पण ते ज्यामधून खेळलेलं दिसतं त्या देहाशी ते कधीच एकरूप होत नाही. ते जसं अलिप्त असतं तसाच हा सिद्ध पुरुषही अलिप्त असतो. तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे परब्रह्म हे प्रेरक व साक्षी असतं तसाच हाही कर्मप्रेरक व साक्षीच राहतो. परब्रह्म जसं सर्वांचं प्रकाशक असतं तसा हा पुरुषही सर्व कर्मांचा प्रकाशक असतो. किंबहुना परब्रह्माची जी लक्षणे आहेत ती या पुरुषाला लावून पारख करावी. त्या सर्व परीक्षेत हा उज्ज्वल यश प्राप्त करील. या पुरुषाचं स्वरूप परब्रह्माच्या स्वरूपाप्रमाणं देदीप्यमान असतं. चैतन्यमय परब्रह्मरूप असूनही त्याच्या देहाकडून कर्मे होतच असतात.

ऐसाहि परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें ।

तरी तियें लया जाती निःशेखें । तयाच्याचि ठायीं ।

अशी अलौकिक स्थिती प्राप्त झाली तरी त्याच्या देहाकडून घडणारी यज्ञादी कर्मे तो करतच असतो. इतरांच्या जीवनाप्रमाणे याचंही जीवन चाललेलंच असतं. फरक इतकाच की त्या कर्मांचा कोणताही गुणदोष याला चिकटत नाही. तो जी जी कर्मे करतो ती त्या कर्मांच्या गुणदोषासह त्याच्या ठिकाणीच विराम पावतात. कर्माचा कोणताही अवशेष मागे रहात नाही.

अकाळींचीं अभ्रें जैशीं । उर्मीवीण आकाशीं ।

हारपती आपैशीं । उदयलीं सांती ।

तैशीं विधिविधानें विहितें । जरी आचरे तो समस्तें ।

तरी तियें ऐक्मयभावें ऐक्मयातें । पावतीचि गा ।

पावसाळय़ात येणारे ढग जड असतात, कारण ते पाण्यानं भरलेले असतात. परंतु आकाशात अकाली आलेले ढग हे पोकळ व हलके असतात. ते जसे चटकन येतात तसेच ते चटकन आकाशातच विरतात. ते काही पाऊस पाडीत नाहीत. त्यांची गर्जनाही नसते. त्यांना कसली उर्मीच नसते. जसे ते ढग आकाशात निर्माण होतात, तसेच अगदी थोडय़ा वेळात ते आकाशातच विलीन होतात. त्याचं काही शेष शिल्लक राहात नाही. तसंच ह्या सिद्ध पुरुषाचं कर्म असतं. त्यात कोणतीही उर्मी नसते, फळाची अपेक्षा नसते, कर्तृत्वाचा फुंज नसतो. म्हणून यज्ञयागादिक महान कर्मे असोत वा इतर क्षुल्लक कर्मं असोत ती जशी त्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी निर्माण होतात तशीच ती ताबडतोब त्याच्या ठिकाणी विलीन होतात, त्याच्याशीच एकरूप होतात.

हें हवन मी होता । कां इयें यज्ञीं हा भोक्ता ।

ऐसिया बुद्धीसि नाहीं भिन्नता । म्हणौनियां ।

होमहवन करीत असूनही अशा सिद्ध पुरुषांच्या ठिकाणी द्वैतबुद्धीचा अभाव असतो. हे यज्ञकर्म मी केलं, ह्याचं फळ मला मिळेल, ह्या हवनानं देव संतुष्ट होतील आणि माझ्या इच्छा पूर्ण करतील, अशा प्रकारचं मन त्याच्याजवळ नसतंच.

ऍड. देवदत्त परुळेकर