|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » डॉक्टर्स डे

डॉक्टर्स डे 

परवाच्या रविवारी म्हणजे 1 जुलै रोजी आपल्याकडे डॉक्टर्स डे साजरा झाला. सांप्रत साजरे होणारे अनेक ‘डे’ विदेशातून आलेले असल्यामुळे काही जणांचा त्याला विरोध असतो. पण डॉक्टर्स डे इतरांपेक्षा थोडा निराळा आहे. अद्याप त्याला उत्सवी स्वरूप प्राप्त झालेले नाही. विविध देशात हा डे त्या त्या देशातल्या परंपरांनुसार वेगवेगळय़ा तारखांना साजरा होत असला तरी तो थोडासा आपल्याही मातीतला आहे.

हा डे 1 जुलै रोजीच का? तर 1 जुलै ही गेल्या शतकातील एका सेवाभावी डॉक्टरची आणि स्वातंत्र्यसैनिकाची जन्मतिथी आणि पुण्यतिथी देखील आहे. त्यांचे नाव विधान चंद्र रॉय.

1 जुलै 1882 या दिवशी जन्मलेले विधान ऊर्फ वी.सी. रॉय उत्तम डॉक्टर होते. गणित विषयात बी.ए. झाल्यावर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. ती पदवी मिळाल्यावर 1909 साली लंडनला जाऊन अवघ्या सव्वा दोन वर्षांच्या कालावधीत एम.आर.सी.पी. आणि एफ.आर.सी.एस. या दोन्ही पदव्या मिळवल्या. नंतर त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला. तरी त्यांनी आपली वैद्यकीय सेवा चालू ठेवली. रोज एक तास ते दवाखान्यात आवर्जून येत. 1947 साली त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपालपद आणि नंतर 1948 मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

त्यांनी कोलकाता येथे पदव्युत्तर शिक्षण देणारे पहिले वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले. त्याखेरीज आर. जी. कर मेडिकल कॉलेज, जादवपूर टी.बी. हॉस्पिटल, चित्तरंचन सेवा सदन, कमला नेहरू हॉस्पिटल, चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल, व्हिक्टोरिया इन्स्टिटय़ूशन वगैरेची स्थापन केली.

कोलकात्याचे महापौर असताना मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, वीज आणि पाणीपुरवठा वगैरेची सोय केली. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असताना दुर्गापूर, कल्याणी, बिधाननगर, अशोकनगर, हावरा या पाच शहरांची स्थापना आणि विकास केला.

1961 साली त्यांनी आपले राहते घर समाजाला दान केले.

भारत सरकारने फेबुवारी 1961 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.

1964 साली त्यांचे निधन झाले.

1976 सालापासून वैद्यक, राजकारण, विज्ञान, तत्त्वज्ञान, वाङ्मय आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱयांना बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार द्यायला सुरुवात झाली.